पाश्चात्य गोष्टी स्वीकारताना आपली संस्कृतीही जपावी : डॉ. सदानंद मोरे

पुणे
प्रशांत जाधव
Updated Jan 06, 2022 | 15:55 IST

पाश्चात्य कालगणनेसारख्या गोष्टी आपण स्वीकारल्या तरी, त्यासोबत आपल्या संस्कृतीतील गोष्टीही जपल्या पाहिजेत. चांगल्या गोष्टी कुठूनही घ्याव्यात, पण आपल्या चांगल्या गोष्टी विसरू नयेत, असे आवाहन संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी येथे केले.

Our culture should be preserved while accepting western things says Dr. Sadanand More
पाश्चात्य गोष्टी स्वीकारताना आपली संस्कृतीही जपावी : डॉ. सदानंद मोरे   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • पाश्चात्य कालगणनेसारख्या गोष्टी आपण स्वीकारल्या तरी
  • त्यासोबत आपल्या संस्कृतीतील गोष्टीही जपल्या पाहिजेत. चांगल्या गोष्टी कुठूनही घ्याव्यात, पण आपल्या चांगल्या गोष्टी विसरू नयेत
  • आवाहन संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी येथे केले.

चाकण : पाश्चात्य कालगणनेसारख्या गोष्टी आपण स्वीकारल्या तरी, त्यासोबत आपल्या संस्कृतीतील गोष्टीही जपल्या पाहिजेत. चांगल्या गोष्टी कुठूनही घ्याव्यात, पण आपल्या चांगल्या गोष्टी विसरू नयेत, असे आवाहन संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी येथे केले. संत साहित्याचे अभ्यासक  डॉ. श्रीरंग गायकवाड यांनी संपादीत केलेल्या ।।ज्ञानबातुकाराम।। या वार्षिक अंकाच्या 'बा तुकोबा' या संत तुकाराम महाराज विशेषांकाचे प्रकाशन डॉ. मोरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. (Our culture should be preserved while accepting western things says Dr. Sadanand More)

यावेळी माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे, संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख माणिकमहाराज मोरे, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार भास्कर हांडे, जेष्ठ पत्रकार संजीव शाळगावकर, महेश म्हात्रे, यमाजी मालकर, ह. भ. प. सचिन पवार, प्राचार्य पांडुरंग गायकवाड, माजी शिक्षणाधिकारी संभाजी लोंढे, नानासाहेब लोंढे, बाळासाहेब लोंढे,
ह. भ. प. मधुकर गायकवाड, हरिती पब्लिकेशनचे दीपक कसाळे, हर्मिस प्रकाशनचे सुशील धसकटे, जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे, सर्व माध्यमांतील पत्रकार, भामचंद्र सप्ताह समितीचे सर्व पदाधिकारी, वारकरी, गावकरी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


यावेळी डॉ. मोरे म्हणाले, पाश्चात्य गोष्टीही आपण आपल्या पद्धतीने बदल करून स्वीकारल्या. उदा. पोर्तुगिजांनी आपल्याकडे पाव आणला. आपण त्याचा वडापाव केला. 'मिराशी' हा तुकोबारायांनी अभंगात वापरलेला शब्द पर्शियन आहे. म्हणजे परकीय भाषेतील शब्दही आपण आपलेसे केले. म्हणजेच कालानुरुप बदल व्हावेत. वारकरी परंपरेत ज्ञानेश्वर माउलींच्या ज्ञानेश्वरीवर प्रवचन केले जाते. आता तुकाराम महाराजांच्या गाथेवरही प्रवचन होण्यास हरकत नसावी.

ते पुढे म्हणाले, वैकुंठवासी निवृत्ती महाराजांनी निस्वार्थपणाने संतसेवा केली. त्यांचीच परंपरा डॉ. श्रीरंग गायकवाड आणि कुटुंबीयांनी पुढे चालविली आहे. ।।ज्ञानबातुकाराम।। हे संत साहित्यालाला वाहिलेले वार्षिक हे त्याचेच उदाहरण आहे. आपण अशा गोष्टींना बळ दिले पाहिजे. यावेळी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रकाशनापूर्वी उपस्थितांनी भामचंद्र डोंगरावर जाऊन तुकोबारायांच्या ध्यान स्थानाचे दर्शन घेतले. या ठिकाणी महेश म्हात्रे यांनी तुकाराम महाराजांच्या कार्याचे महत्त्व विशद केले. तर, डॉ. श्रीरंग गायकवाड आणि ह. भ. प. दत्तात्रय महाराज ढोणे यांनी संत तुकाराम महाराजांच्या अभंगांचे गायन केले. प्रकाशनानंतर भामचंद्र डोंगराच्या पायथ्याशी आईनाना प्रतिष्ठानच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले.


दर १ जानेवारीला नवे वर्षे तुकाराम महाराजांच्या सान्निध्यात सुरू करण्याचा निश्चय यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला. आभार प्राचार्य पांडुरंग गायकवाड यांनी व्यक्त केले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी