मोठी बातमी: यंदा आषाढी वारीचा पायी दिंडी सोहळा रद्द, पाहा काय झाला निर्णय 

Pandharpur Wari: आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघणारी पायी दिंडी, पालखी यंदाच्या वर्षी होणार नाहीये. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेत हा निर्णय घेण्यात आला आहे. 

pandharpur wari procession cancelled this year due to covid19 check full details in marathi
यंदा आषाढी वारीचा पायी दिंडी सोहळा रद्द, पाहा काय झाला निर्णय   |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • पायी दिंडी सोहळा यंदाच्या वर्षी रद्द 
  • कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला निर्णय 
  • हेलिकॉप्टर किंवा अन्य वाहनातून संतांच्या पादुका पंढरपूरला नेणार 

पुणे: संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांची आषाढी पायी वारीला वारकरी संप्रदायात एक ऐतिहासिक महत्व आहे. अनेक वर्षांची परंपरा या वारीला आहे. लाखो वारकरी या वारीत सहभागी होतात. मात्र, यंदा कोरोनामुळे उद्धभवलेली परिस्थिती पाहता पायी पालखी सोहळा न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज दुपारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी यांच्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. आषाढी वारीची परंपरा जपण्यासाठी राज्यशासन सर्वतोपरी प्रयत्नशील असल्याचे सांगतानाच आषाढीवारीसाठी परवानगी देण्यात येणाऱ्या पादुका दशमीला श्री क्षेत्र पंढरपूर येथे पोहचविण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

कोरोनाचा प्रादुर्भाव आणि त्यानुसार लॉकडाऊनचे स्वरूप पाहता श्री संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराजांची पायी वारी व पालखी सोहळ्याच्या बाबत हा निर्णय घेण्यात आला आहे. आळंदी आणि देहु येथून येणाऱ्या संतांच्या पादुका हेलिकॉप्टर, विमान किंवा एसटीने पंढरपूरला यायला हव्या अशी भूमिका बैठकीत वारकऱ्यांच्या प्रतिनिधींनी मांडली. 

हेलिकॉप्टर, विमान किंवा बसने पादुका पोहोचवणार

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, आषाढी वारीला अनेक वर्षाची परंपरा आहे, वारीची ही परंपरा खंडीत होऊ नये यासाठी राज्यशासन सर्वतोपरी प्रयत्नशील आहे. वारीची ही परंपरा अखंडीत ठेवण्यासाठी राज्यातील प्रमुख व संबंधित जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी परवानगी दिलेल्या संस्थांनच्या पादुकांना राज्य शासनाच्यावतीने विमान, हेलिकॉप्टर किंवा बसने दशमीला पंढरपूर येथे पोहचविण्यात येईल. विमान तसेच हेलिकॉप्टरबाबत हवामानाचा अंदाज घेत याबाबतचा निर्णय राज्य सरकार राखून ठेवत आहे. याबाबतचा निर्णय घेताना संबंधित संस्थानला विश्वासात घेऊन निर्णय घेण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी स्पष्ट केले. 

लॉकडाऊनचे स्वरूप पाहता श्री संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराजांची पायी वारी व पालखी सोहळ्याच्या स्वरूपाबाबत निर्णय घेतला जाणार आहे. सोलापूर, सातारा व पंढरपूर येथील मान्यवरांची आषाढी वारी पालखी सोहळ्याबाबतची मते विचारात घेतली जाणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं. त्यानंतर आज वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, आळंदी देवस्थानचे प्रमुख यांच्यात झालेल्या बैठकीत पायी दिंडी सोहळा यंदा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी