पुणे : काही दिवसांपूर्वी पुण्यातील कुख्यात गुंड गजानन मारणे (gajanan marane) याचा व्हिडिओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाला होता. गजानन मारणे याची एका प्रकरणातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर समर्थकांनी त्याची जंगी मिरवणूक काढली होती. त्यानंतर पोलिसांनी (police) त्याच्यावर गुन्हा देखील दाखल केला होता. दरम्यान, त्याला जामीन मिळाला. मात्र गजान मारणे आता फरार झाला आहे. वारजे माळवाडी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यात आरोपी गजानन मारणे फरार असल्याची माहिती देण्यात आली आहे. मारणेच्या शोधासाठी वारजे पोलिसांनी स्वतंत्र पथकं नेमली आहेत.
कुख्यात गुंड गजानन मारणे याची एका प्रकरणातून न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. त्यावेळी त्याच्या साथीदारांसह द्रुतगती महामार्गावरुन पुण्याच्या दिशेने येत होता. त्यावेळी त्याच्या समर्थकांनी उर्से टोल नाका येथे थांबून फटाके वाजवून आरडा-ओरडा केला होता. या सर्वाचे ड्रोन कॅमराने चित्रीकरण करून दहशतीचे वातावरण निर्माण झाली होती. या प्रकरणाचे व्हिडिओ देखील सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाले होते.
गजानन मारणे याची तळोजा कारागृहातून सोमवारी निर्दोष मुक्तता झाल्यानंतर त्याची पुण्यापर्यंत जंगी मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जवळपास तीनशे ते पाचशे चारचाकी गाड्या आल्या होत्या. यावेळी मारणेचे साथीदार द्रुतगती महामार्गावर थांबून आरडाओरडा करुन दहशत पसरवण्याचा प्रयत्न करत होते. या धांगडधिंगा प्रकरणात पोलिसांनी गजा मारणेला याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक देखील केली होती.
पुणे पोलिसांनी एक निवेदन जारी केलं आहे. त्या निवेदनात गजानन मारणेसह त्याचे साथीदार पोलिसांच्या अटकेच्या भीतीने फरार झाल्याचंही नमूद करण्यात आलं आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांची अनेक पथकं तयार करण्यात आली असल्याचंही यात सांगण्यात आलं. गजानन मारणेसह साथीदारांवर पुण्यातील चांदणी चौकात कोरोनाच्या संसर्गाला कारणीभूत ठरल्याचा, बेकायदेशीर मिरवणूक काढल्याचा, आणि त्याला रोखणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना धक्का दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
गुंड गजानन मारणे याच्या संपत्तीची आणि बँक खात्यांची माहिती गोळा करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. विशेष म्हणजे निश्चित मुदतीत गजानान मारणे सापडला नाही तर त्याची मालमत्ता जप्तीची कारवाई देखील सुरु करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित पोलीस पथकांनी मारणेसह त्याच्या साथीदारांच्या घरांसह लपण्याच्या विविध ठिकाणी अचानक छापेमारी सुरु केली आहे. तसेच आरोपींना लपण्यास मदत करणाऱ्यांवरही कठोर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.