गोळीबारात पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश जखमी , जीवाची पर्वा न करता आरोपींना जिवंत पकडले

police commissioner krushna prakash Injured : आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पळू लागले. त्याचवेळी आयुक्त कृष्ण प्रकाश त्यांच्यासमोर आडवे आले. त्यांनी बाजूला पडलेल्या एका मोठ्या झाडाचा ओंडका पळणाऱ्या आरोपींच्या छातीवर टाकला. झाडाच्या ओझ्याने तीनही आरोपी खाली पडले

police commissioner krushna prakash Injured
गोळीबारात पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश जखमी  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • कृष्ण प्रकाश यांनी दाखवलेल्या धाडसामुळे आरोपींना जिवंत पकडण्यात पोलिसांना यश
  • आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पळू लागले होते
  • गुन्हेगारांनी १८ डिसेंबरला पिंपळेगुरव मध्ये दिवसाढवळ्या गोळीबार केला होता

पुणे : अंधाराचा फायदा घेऊन गुन्हेगार पळून जाण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या गुन्हेगारांना पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश (Police Commissioner Krushna Prakash ) यांनी धाडस दाखवत आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. कृष्ण प्रकाश यांनी दाखवलेल्या धाडसामुळे आरोपींना जिवंत पकडण्यात पोलिसांना यश आलं. दरम्यान,  कुख्यात गुन्हेगारांना (Criminals) पकडण्यासाठी गेलेल्या पिंपरी चिंचवड पोलीसांवर गुन्हेगारांनी गोळीबार (Firing) केल्याची घटना देखील घडली या घटनेदरम्यान पोलिसांनीदेखील क्रॉस फायरिंग करत गुन्हेगारांच्या दिशेने दोन राउंड फायर केले.

अशी घडली थरारक घटना?

पोलीस आरोपीना पकडण्यासाठी पुढे गेले असता आरोपींनी त्यांच्याकडील पिस्तूलातून दोन गोळ्या झाडल्या. प्रत्युत्तर देत पोलिसांनी देखील दोन राउंड फायर केले आणि सगळे आपल्या पोजिशनवर गेले. यावेळी आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पळू लागले. त्याचवेळी आयुक्त कृष्ण प्रकाश त्यांच्यासमोर आडवे आले. त्यांनी बाजूला पडलेल्या एका मोठ्या झाडाचा ओंडका पळणाऱ्या आरोपींच्या छातीवर टाकला. झाडाच्या ओझ्याने तीनही आरोपी खाली पडले आणि वेळेचं भान राखत मोहिमेत सहभागी असलेल्या इतर पोलीस कर्मचारी-अधिकाऱ्यांनी आरोपींना जेरबंद केलं. या दरम्यान पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश आणि गुन्हेगारांमध्ये मोठी झटापट झाली आणि त्यात प्रकाश हे किरकोळ जखमी झाले आहेत.

गुन्हेगारांनी १८ डिसेंबरला पिंपळेगुरव मध्ये दिवसाढवळ्या गोळीबार केला होता

या गुन्हेगारांनी १८ डिसेंबरला पिंपळेगुरव मध्ये दिवसाढवळ्या गोळीबार केला होता, यात योगेश जगतापची हत्या झाली होती. या आरोपीना पकडण्यासाठी पोलिसांनी अनेक प्रयत्न केले होते. मात्र,आरोपी पोलिसांच्या हाती लागत नसल्याने पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या नेतृत्वात अँटी गुंडा स्कॉड आणि सांगवी पोलीस गोळीबारातील आरोपींच्या मुसक्या आळवण्यासाठी सापळा रचला होता.  मात्र पोलिसांनी रचलेल्या सापळ्यातून देखील सुटण्यासाठी तिन्ही आरोपींनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला, मग प्रत्युत्तरात पोलिसांना देखील गोळीबार करावा लागला. या चकमकीत पोलिसांनी या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. पोलिसांनी केलेल्या या कामगिरीमुळे त्यांचे सर्वत्र कौतुक देखील केले जात आहे. 

सुदैवाने या गोळीबाराच्या घटनेत कोणालाही गोळी लागली नाही

पिंपरी चिंचवडमधील गुन्हेगारी आधीच चर्चेत असताना आता पिंपळेगुरव मध्ये दिवसाढवळ्या गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. आतापर्यत सर्वसामान्यांना गुंडांची दहशत वाटत होती. काहीवेळा दोन गुन्हेगारी टोळ्यांमध्ये चकमकी होत होत्या. आता मात्र थेट पोलिसांवर गोळीबार झाला आहे. चाकण पोलीस स्टेशनच्या हद्दीत साडे अकराच्या सुमारास घडली आहे. सुदैवाने या गोळीबाराच्या घटनेत कोणालाही गोळी लागली नाही. पण एक पोलीस कर्मचारी खाली पडल्याने त्यांना किरकोळ इजा पोहोचली आहे. या गोळीबारानंतर आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. मात्र यातून पिंपरी चिंचवडमधील गुन्हेगारी आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. आगामी काळात प्रशासन यासंदर्भात कडक पावले उचलते का याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी