VIDEO: लोकं सुधारणार कधी...? बारामतीत पोलिसांनाच मारहाण!

पुणे
रोहित गोळे
Updated Mar 28, 2020 | 12:40 IST

महाराष्ट्रात कोरोना संसर्गाची प्रकरणे सतत वाढत आहेत. अशा परिस्थितीत पोलिस सतत लोकांना लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करण्याचा आग्रह करत आहेत. पण बारामतीत चक्क पोलिसांनाच मारहाण करण्यात आली आहे.

police officers were forced to follow the rules of lockdown people snatched sticks and beat them fiercely
VIDEO: लोकं सुधारणार कधी...? बारामतीत पोलिसांनाच मारहाण!  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांमध्ये सतत वाढ
  • बारामतीत लॉकडाऊनचे नियम पाळण्यास सांगणाऱ्या पोलिसांनाच मारहाण
  • राज्यात कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या १५० च्या पुढे

बारामती: देशात कोरोनाचे रुग्ण हे सतत वाढत आहेत. त्यामुळे देशात २१ दिवसाचं लॉकडाऊन करण्यात आलं आहे. आतापर्यंत सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आढळून आले आहे. या प्राणघातक व्हायरसमुळे आतापर्यंत राज्यात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पोलीस सतत लोकांना घरातच राहण्याचं आवाहन करत आहेत. लोकांनी घरात राहून लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन करीत आहेत. परंतु अद्यापही काही लोक आहेत जे या गोष्टी सरळसरळ धुडकावून लावत आहेत. महाराष्ट्रातील बारामती येथे असेच एक प्रकरण समोर आले आहे. लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करायला सांगणे हे पोलिसांना भारी पडलं आहे.

पोलिसाच्या काठ्या हिसकावून त्यांनाच मारहाण

बारामतीमध्ये काही पोलीस कर्मचारी हे जेव्हा लोकांना लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करून घरात राहण्यास सांगत होते तेव्हा लोकांनी चक्क पोलिसांनाच मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यावेळी जमावाने पोलीस कर्मचाऱ्यांच्या काठ्या हिसकावून घेत पोलिसांनाच बेदम मारहाण केली. या मारहाणीत एक पोलीस निरिक्षक आणि तीन अधिकाऱ्यांसह ९ पोलिस कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली. ज्यामध्ये हे सर्व कर्मचारी जखमी झाले आहे. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियामध्येही व्हायरल झाला आहे.

जखमी पोलिस रुग्णालयात दाखल

दरम्यान, जखमी पोलिसांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी सहा हल्लेखोरांविरूद्ध गुन्हा दाखल केला असून चौघांना ताब्यात घेण्यात आलं आहे. बारामती हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो आणि हे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा तो मतदारसंघ आहे. जमावाने पोलिसांनाच   मारहाण केल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. लॉकडाऊनमध्ये पोलिसांना बर्‍याच ठिकाणी डबल ड्युटी करावी लागत आहे. मात्र, या सगळ्यात लोकांकडून सहकार्य मिळण्याऐवजी आता पोलिसांवरच हल्ले होऊ लागल्याने पोलीस दलातून नाराजी व्यक्त केली जात आहे. 

पोलिसांकडून जनतेला घरातच राहण्याचं आवाहन 

कोरोना व्हायरसच्या वाढत्या उद्रेकादरम्यान, सरकार लोकांना संयम ठेवून फक्त आपआपल्या घरात राहण्याचं आवाहन करत आहे. एकीकडे राज्यात कोरोना व्हायरसचा वाढत्या धोका लक्षात घेऊन पोलीस सर्व प्रकारे जनतेला घरात राहण्याचे आवाहन करत आहे. एवढंच नव्हे तर एक पोलिस हिंदी चित्रपटातील लोकप्रिय गाणे गाऊन लोकांना घरातच थांबण्याचं आवाहन करत असल्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. महाराष्ट्र आरोग्यमंत्री अनिल टोपे यांनी शुक्रवारी सांगितले की, राज्य सरकार कोरोना व्हायरसची लागण झालेल्या वैद्यकीय कर्मचार्‍यांना विमा संरक्षण देण्याचा विचार करीत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी