‘येवले अमृततुल्य’ चहा पिणाऱ्यांनो सावधान! जाणून घ्या काय म्हटलय एफडीएने

पुणे
Updated Jan 22, 2020 | 17:29 IST | टाइम्स नाऊ मराठी

खूप कमी काळात अनेकांच्या जीभेवर आपल्या आवडीची चव निर्माण करणाऱ्या ‘येवले अमृततुल्य चहा’ला अन्न आणि औषध प्रशासनाचा दणका बसलाय. जाणून घ्या काय म्हणणं आहे एफडीएचं या चहाबाबत...

Yewale Tea
‘येवले अमृततुल्य’ चहा पिणाऱ्यांनो सावधान! पाहा काय घडलंय  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • 'येवले अमृततुल्य चहा'वर एफडीएची कारवाई
  • चहात भेसळ असल्याचा अन्न व औषध प्रशासनासमोर सिद्ध
  • चहाला लाल रंग येण्याचं कारण जाणून घ्या

पुणे: चहाप्रेमींमध्ये खूप कमी काळात प्रसिद्ध झालेल्या ‘येवले अमृततुल्य चहा’ला आता अन्न आणि औषध प्रशासनाचा दणका बसलाय. पुण्यातील या प्रसिद्ध चहात भेसळ आढळल्याचं एफडीएनं म्हटलंय. याबाबत केंद्र सरकारच्या प्रयोगशाळेत चहाची तपासणी करण्यात आली. यानंतर चहात भेसळ असल्याचं समोर आलंय. एफडीएकडून याबाबत माहिती देण्यात आलीय.

आपल्याला माहितीच आहे ‘येवले अमृततुल्य चहा’नं अल्पावधीतच मार्केटमध्ये आपलं नाव निर्माण केलंय. राज्यातील अनेक शहरांमध्ये आता येवले चहाच्या शाखा सुरू झाल्या आहेत. पुण्यातून ‘येवले अमृततुल्य चहा’च्या शाखांना सुरुवात झाली. अल्पावधीतच पुणेकर चहाप्रेमींच्या मनात ‘येवले अमृततुल्य चहा’नं स्थान मिळवलं. त्यानंतर अनेक शहरांमध्ये याच्या शाखा काढल्या गेल्या. कुठल्याही वेळी आता चहा पिण्याची इच्छा झाली की अनेक लोक ‘येवले अमृततुल्य चहा’ प्यायला जातात.

मात्र काही महिन्यांपूर्वी येवले चहावर अन्न आणि औषध प्रशासन म्हणजेच एफडीएनं धाड टाकत चहाचे काही नमुने जप्त केले होते. या जप्त केलेल्या मालाचा पहिला रिपोर्ट चांगला होता. पण दुसऱ्या रिपोर्टमध्ये चहात सिथेंटिक फूड कलर मिसळला असल्याचं आढळलं. या फूड कलरमुळेच चहाला लाल रंग येतो. केंद्रीय प्रयोग शाळेनं हा रिपोर्ट एफडीएकडे सुपूर्द केला आहे.

या धाडीनंतर कारवाई करत अन्न आणि औषध प्रशासनानं ‘येवले अमृततुल्य चहा’ची राज्यभरातील उत्पादनं आणि विक्री बंद करण्याचे आदेश दिले होते. मात्र तरीही अनेक शहरांमध्ये येवलेच्या शाखा सुरूच होत्या. पण जी दुकानं बंद झाली तिथले चहाप्रेमी काहीसे नाराज झाले होते. मात्र आता चहामध्ये पुन्हा भेसळ आढळल्यामुळे यावर कारवाई करण्यात येणार आहे.

काही दिवसांपूर्वी एफडीएनं पुण्यातील कोंढवा भागात असलेल्या ‘येवले चहा’च्या कंपनीवर छापा टाकला होता. तेव्हा त्यांना चहाच्या उत्पादनात आणि विक्रीत खूप त्रूटी आढळल्या होत्या. या चहामध्ये आरोग्यासाठी घातक असलेला ‘मेलानाईट’ हा पदार्थ वापरला जात असल्याचा संशय देखील व्यक्त करण्यात आला होता आणि एफडीएनं ही कारवाई केली.

सोबतच ‘येवले चहा’ विरोधात दिशाभूल करणारी जाहिरात प्रसिद्ध केली म्हणून सुद्धा नोटीस बजावण्यात आली होती. चहा तयार करण्यासाठी मिनरल वॉटर वापरलं जात असल्याची ही जाहिरात होती. याप्रकरणी ॲडव्हर्टायझिंग स्टँडर्ड कॉन्सिल ऑफ इंडियाकडे तक्रार करण्यात आली होती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी