पुणे : पेट्रोल पंपावरुन पेट्रोल आणि डिझेलची चोरी (Petrol and Diesel theft) करणाऱ्या एका टोळीला पुणे पोलिसांनी (Pune Police) अटक केली आहे. एकूण पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या इंधन चोरी करणाऱ्या रॅकेटमध्ये बीपीसीएल (BPCL)च्या अधिकाऱ्यांचाही समावेश असल्याचा संशय पोलिसांना आहे. या संशयित अधिकाऱ्यांसह एकूण पाच जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पुणे शहर पोलिसांनी बीपीसीएलच्या अधिकाऱ्यांसह पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्यावर इंधन चोरी करणाऱ्या रॅकेटमध्ये सहभागी असल्याचा संशय आहे. या संदर्भात इंडियन एक्सप्रेसने वृत्त दिलं आहे. पेट्रोल पंपावर येणाऱ्या टँकरमधून पेट्रोल आणि डिझेलची चोरी करुन ही टोळी अवैधरित्या काळ्या बाजारात त्याची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई केली आहे.
हे पण वाचा : मुंबईत पश्चिम रेल्वेचा सर्वात मोठा स्कायवॉक
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये बालाजी मधुकर बजबळकर (41), दत्तात्रय गजेंद्र बजबळकर (41), उत्तम विजय गायकवाड (31), अजिंक्य शिरसाठ (26) आणि साहिल दिलीप तुपे (22) यांचा समावेश आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून पोलिसांनी एकूण 80 लाख रुपयांचा बीपीसीएल टँकर, काही रोख रक्कम, तीन डिझेल कॅन, तीन मोटारसायकल आणि इतर साहित्य जप्त केले आहे.
पोलिसांना या प्रकरणाची गुप्त माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पुणे शहर पोलीस, जिल्हा पुरवठा अधिकारी आणि बीपीसीएल डेपो प्रभारी यांनी सोमवारी शहरातील लोणी काळभोर परिसरात छापा टाकला. त्यानंतर हा प्रकार समोर आला.
हे पण वाचा : अंघोळीसाठी तलावात 7 मित्र गेले पोहायला, परतले फक्त 5; दोघांचा बुडून मृत्यू
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बालाजी आणि दत्तात्रय बजबळकर हे दोघे रॅकेट चालवतात. तर तुपे हा टँकर ट्रान्सपोर्ट मॅनेजर असून त्याने टँकरचालक असलेल्या शिरसाठ याच्या मदतीने इंधन चोरीचं काम करत होते. बीपीसीएलच्या टँकरमधून इंधन काढण्यात गायकवाड याची भूमिका होती अशी माहिती समोर आली आहे.
ट्रान्सपोर्टचा मालक रोशन कुंजीर आणि राहुल कुंजीर हे दोघेही लोणी काळभोरचे रहिवासी आहेत. तर मारुती कुंजीर याची वाल्टी गावात जमीन आहे. या जमीनीवर बीपीसीएलचे टँकर बेकायदेशीरपणे पार्क करुन इंधन चोरी केली जात होती.