मितेश घट्टे
अपर पोलीस अधीक्षक , पुणे ग्रामीण
pune rural police made proper management of crowd on 31st December and koregaon bhima Shaurya Diwas during corona era :
कोरेगाव भिमा हे महाराष्ट्रात भीमा नदीच्या किनाऱ्यावर वसलेले एक गाव आहे. याच गावाच्या परिसरात 1 जानेवारी 1818 रोजी ब्रिटिशांच्या महार बटालियनने पेशव्यांच्या सैन्याचा पराभव केला. हा विजय दिवस शौर्य दिन म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी 1 जानेवारी रोजी कोरेगाव भिमा येथे मोठ्या संख्येने दलित बांधव जमतात आणि शौर्य दिन साजरा करतात. आता 21व्या शतकात 31 डिसेंबरच्या संध्याकाळी नववर्षाचा स्वागत सोहळा आणि 1 जानेवारी रोजी शौर्य दिन यामुळे पुणे जिल्ह्यात पोलिसांवर 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी या दोन्ही दिवशी चोख बंदोबस्त ठेवून गर्दीच्या व्यवस्थापन करण्यासाठी प्रचंड ताण असतो. पण पोलिसांनी कोरोना काळ सुरू असूनही यंदा हेव्यवस्थापन प्रभावीरित्या केले. पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक करावे तेवढे थोडेच...
नववर्षाची पूर्वसंध्या पुणे पोलिसांसह महाराष्ट्र पोलिसांच्या सहनशक्तीचा कस पाहणारा ठरते. कोरोना काळाच्या दोन वर्षांच्या खंडानंतर एकीकडे सारेच सण, उत्सव गर्दीत, जल्लोषात साजरे होत असल्याने पोलिसांच्या जबाबादारीत आणखी वाढ झाली. कायदा व सुव्यवस्था या दोन शब्दांना अजिबात धक्का लागू नये म्हणून कर्तव्य बजावताना पोलिसांची कसोटी लागते. कोरेगांव भिमा येथील शौर्य दिनाचा बंदोबस्ताचे नियोजन पार पाडताना प्रत्येक पोलीस कर्मचारी ते वरिष्ठ अधिकारी यांनी बजावलेली भुमिका हे नेटक्या नियोजनाचे उदाहरणच...! अभूतपुर्व गर्दीत शौर्यदिन पार पाडताना पोलिसांनी कर्तव्याला जागून सलग चाळीस तासांपेक्षा जास्त जे कष्ट घेतले ते ‘कायदा व सुव्यवस्था’ या दोन शब्दांना अबाधित ठेवून गेले. 31 डिसेंबरपर्यंत वाटणारे आव्हान एकमेकांच्या समन्वयातून 1 जानेवारीच्या रात्री एका अनुभवात बदलून गेले.
तणावाच्या घटना टाळण्यासाठी दि. १ जानेवारीला बंदोबस्त, हजारो वाहनांच्या पार्कींगचे नियोजन, लाखो अनुयायांच्या येण्या जाण्याच्या मार्गाची व्यवस्था, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून डोळ्यात तेल घालून रात्रंदिवसचा खडा पहारा याचा अनुभव पोलीस दलात कर्मचारी ते वरिष्ठातील वरिष्ठ अधिकारी घेत आहेत. यंदा मात्र अलोट गर्दीचा अंदाज घेऊन पुणे पोलीस दलाने नियोजनाचा आराखडा तयार केला. कोरोनाच्या दोन वर्षांच्या खंडांनंतर शौर्यदिनाला अनुयायांची प्रचंड गर्दी होणार हे गृहीत होते.
तत्कालीन विशेष पोलीस महानिरिक्षक विश्वास नांगरे-पाटील, सुहास वारके, मनोज लोहिया, पुण्याचे तात्कालीन पोलीस अधीक्षक संदीप पाटील, डॉ. अभिनव देशमुख तसेच डॉ. संदीप पखाले व मिलिंद मोहिते यांनी त्यांच्या कार्यकाळात बंदोस्ताचा आराखडा, व्युहरचना आखताना प्रचंड बारकावे टिपत एक नवा पॅटर्न विकसित केला आहे. त्या धर्तीवरच यंदा वाढणारी गर्दी लक्षात घेऊन पुणे पोलीस दलाचे नियोजन सुरू होते. केवळ अधिकारीच नव्हे तर प्रत्येक पोलीस कर्मचारी याच्या अनुभवाच्या चर्चेतून समन्वय साधत आराखडा कागदावर उतरवला जात होता.
‘विजयस्तंभ’ नव्याने पुणे शहर हद्दीत येत असला तरी आजुबाजूचा सारा परिसर पुणे ग्रामीण हद्दीत येत असल्याने बंदोबस्तासह सर्व नियोजनात पुणे ग्रामीण पोलीसांचा बरोबरीने सहभाग आहे.
यावेळी दुपटीने गर्दी होणार हे लक्षात घेऊन 27 डिसेंबर 2022 पासून उभ्या महाराष्ट्रातूून तब्बल चार हजार पोलीस अधिकारी व अंमलदार या परिसरात बंदोबस्ताला रुजू होण्यासाठी येत होते. आपल्याला नेमून दिलेल्या ठिकाणी कर्तव्य बजावताना ते थोडे पण थकत नव्हते. पोलीस म्हणून जी शपथ घेतली आहे त्यातील प्रत्येक शब्द ह्रदयात जागा ठेवून पोलीस कर्तव्याच्या ठिकाणी उभा दिसत होता...कुचराई नाही की ताण आला तरी तो दाखवला जात नाही हेच पोलिसांचे खरे रूप अनेकांच्यात पहायला मिळाले...मोठ्या पोलीस फौजफाट्यामुळे या परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते.
गर्दी वाढत होती तसे नियोजनातील प्रत्येक प्लॅनची अंमलबजावणी वेगाने केली जात होती. त्यासाठी प्रत्येक पोलीस अधिकारी कायम अलर्ट मोडवर होते... वाहनांच्या गर्दीचा अंदाज घेऊन आम्ही तब्बल आठ ठिकाणी पार्कींग व्यवस्था केली होती. या व्यवस्थेवर लक्ष ठेवून घाईगोंधळ होणार नाही याची जबाबदारी प्रत्येक अपर पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकारी यांच्यावर सोपवली होती. मराठवाडा विर्दभाकडून येणारे अनुयायांसाठी शिक्रापूर हद्दीत तोरणा पार्कींग तयार केले होते. वाढत चाललेल्या अनुयायांच्या वाहनांचा अंदाज घेऊन पोलीस व्युहरचनेनुसार जीत ढाबा पार्कींग व्यवस्था नव्याने केली होती. केवळ पार्कींगच नव्हे तर पिण्याचे पाणी, वैद्यकीय सेवा, सार्वजनिक स्वच्छतागृहाची व्यवस्था पुरविण्यासाठी शासनाचे विविध विभाग गुंतले होते.
बंदोबस्तासह सर्वच व्यवस्थेत कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी सर आणि पोलीस अधीक्षक अंकीत गोयल सर यांनी प्रत्येक ठिकाणाचे स्वतः पर्यवेक्षण सुरू ठेवले होते. जिथे बदल करावा वाटेल तिथे ते ताबडतोब सुचना देत वेगवान कार्यवाहीला प्रोत्साहीत करत होते.
अनुयायांनी वाहने पार्कींग केल्यावर त्यांना पेरणे फाटा येथील विजयस्तंभाकडे जाण्यासाठी PMPL ची मोफत बस सुविधा उपलब्ध करून दिली होती.
शिरुरचे पोलीस उपाधिक्षक यशवंत गवारी व शिक्रापूरचे पोलीस निरिक्षक हेमंत शेडगे यांनी आपल्या स्थानिक जबाबदारीचे भान ठेवत सारी पुर्वतयारी केली. त्यासाठी चोवीस तासात त्यांचे पाय मिनिटभरासाठी सुद्धा थांबले नाहीत. दिवसा दुपारनंतर उन्हाचा तडाखा तर मध्यरात्रीनंतर थंडीचा कडाका...या वातावरणात बंदोबस्तावरील पोलिसांना आवश्यक सुविधा पुरवणे गरजेचे होते. पोलिसांंना थंडीपासून बचावासाठी हुडी पुरवणे, चहा देणे यासाठी पहाटेपर्यंत आम्ही स्थानिक अधिकारी व्यस्त होतो.
खरेे आव्हान एक जानेवारीचे होते...ते पेलण्यासाठी आम्ही सज्ज होतोच...पण मध्यरात्रीपासून अनुयायांचा ओघ वाढत गेल्यावर आमच्या धावपळीचा, फोनाफोनीचा, वायरलेस मेसेजचा वेग आणखी वाढला. अनुयायांच्या वाहनांची संख्या एवढी वाढली की रविवारी सकाळी भले मोठे तोरणा पार्कींग तब्बल 80 टक्क्यांपेक्षा जास्त भरले होते. त्याचा अंदाज घेत नव्याने तयार ठेवलेले जीत ढाब्या समोरचे पार्कींग सुरू करण्याची वेळ येऊन ठेपली. एसपी गोयल सरांचे लक्ष प्रत्येक हालचालीवर असल्याने त्यांनी तातडीने जीत पार्कींग सुरू करण्याचे आदेश दिले. एसपी सरांचा आदेश येताच मी डिवायएसपी गवारी आणि बंदोबस्ताला आलेल्या तासगांवच्या डिवायएसपी अश्विनी शेंडगे यांच्या मदतीने अवघ्या 15 मिनिटात जीत ढाब्या समोरचे पार्कींग सुरू करत वाहतूक कोंडी फोडली.
रस्त्यावर अनुयायांची गर्दी होत होती मात्र वाहने रस्त्यात उभा राहिल्याने वाहतूक कोंडीत भर पडून खेचाखेची होण्याची शक्यता होती. ही शक्यता गृहीत धरून सोलापुरचे अपर अधिक्षक हिंमत जाधव यांनी रात्रभर रस्त्यावर खडा पहारा देत रस्त्यावर वाहने उभी न होता ती थेट पार्कींगस्थळी जातील यासाठी लक्षवेधी कष्ट घेतले.
पार्कींग स्थळापासून विजयस्तंभाकडे अनुयायी जाताना समतोल राखला जावा यावर सातारचे अपर पोलीस अधिक्षक बापू बांगर हे प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते. अनुयायांची संख्या अमर्याद वाढताना पोलिसांनीही आपल्या समन्वयात चांगलीच सजगता ठेवली होती. त्यामुळे चाकण चौकात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पंढरपूरचे डिवायएसपी विक्रम कदम यांनी आपले कसब पणाला लावत कोंडी फोडण्याचा प्रयत्न सतत सुरू ठेवला होता.
वढू बुद्रुक येथील जबाबदारी ठाण्याच्या अपर पोलीस अधिक्षक डॉ. दिपाली धाटे, डिवायएसपी राहूल धस, गणेश इंगळे, कृष्णात पिंगळे यांच्यावर होती. डॉ. धाटे यांच्यासह वरिल अधिकारी टिमने एकजुठीने छत्रपती शंभूराजे आणि गोविंदबाळा गायकवाड यांच्या समाधीस्थळी देखरेख कायम ठेवली होती. त्यांनी आपल्या पोलिसींगचे कौशल्य दाखवून दिले. ते दखलपात्र होते.
अनुयायी विजय स्तंभाला अभिवादन करुन पार्किंगकडे परतत असताना त्यांना गर्दीतून वाट काढताना कसरत करावी लागत होती. हा हजारोंचा जनसमुदाय आवरत त्यांनी शिस्तीत बसमधे बसण्याच्या व्यवस्थेत बारामतीचे अपर पोलीस अधिक्षक आनंद भोईटे यांच्यासह डिवायएसपी डॉ. सुदर्शन पाटील, विशाल हिरे, मंदार जवळे यांचीही प्रत्येक क्षणाला कसरत झाली. कितीही दमछाक झाली तरी या टिमने एक क्षण सुद्धा इकडे तिकडे केले नाही. वाढलेली गर्दी आणि बसची संख्या यांचा मेळ घालताना अनुयायांशी संवाद साधून त्यांना प्रत्येकाला बस मिळेल काळजी करू नका हे प्रसंगावधान साधणे त्या क्षणी गरजेचे होते. जनसमुदायाच्या भावना अनावर होऊ नये म्हणून हे प्रसंगावधान राखत आनंद भोईटे स्वतः वॉच टॉवर गेले. तेथून त्यांनी निवेदकाच्या भुमिकेत जनसमुदायाशी संवाद सुरू केला. माईक हातात घेऊन त्यांनी जिवाच्या आकांताने जनसमुदायाला योग्य सुचना करत मार्गदर्शन केले.
फिल्डवर प्रत्येक अधिकारी कष्ट घेत असताना दुसरीकडे पोलीस निरीक्षक सुंभे यांनी सीसीटीव्ही कॅमेरे व ध्वनी व्यवस्थेवरून जराही लक्ष हटवले नाही. प्रेमदीप माने यांनी वाहतूक व्यवस्था कशी चोख राहिल यावर लक्ष केंद्रित केले होते.
विशेष उल्लेख करण्यासारखी बाब म्हणजे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख सर यांनी प्रशासन आणि पोलीस यांचा समन्वय कसा राहिल यासाठी कुटूंबप्रमुखाची जबाबदारी पार पाडली. ते स्वतः पोलीस कंट्रोल रूममधे ठाण मांडून बसले होते. सीसीटीव्ही मॉनेटरिंग करत सुचना देण्यात ते व्यस्त होते. जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाचा समन्वय यातून दिसला.
सदरक्षणाय... खलनिग्रहणाय हे ब्रिदवाक्य कर्तव्यदक्ष पोलिसांच्या रक्तात भिनलेले असते. या कर्तव्याला समाजाची जोड मिळाल्यास एक नवा आदर्श निर्माण होतो. शिक्रापूर आणि सणसवाडी या भागातील हॉटेल, व्यावसायिक, मंगलकार्यालये, खासगी कंपन्यांनी सौजन्य दाखवत निवासाची व भोजनाची व्यवस्था करण्यास पुढाकार घेतला. साहजिकच हे सौजन्य एवढ्या मोठ्या पोलीस फौजफाट्यासाठी आपुलकीचे ठरले.
एकूणच कोरोनाच्या काळानंतर कोरेगाव भीमाला यंदा अभूतपुर्व जनसमुदाय लोटला. त्या जनसमुदायाच्या भावनांचा आदर करत त्यांची गैरसोय होणार नाही हा प्रयत्न पुणे जिल्हा प्रशासन व पुणे पोलीस दलाने केला. यात राज्यातून आलेल्या पोलिसांची भुमिका अत्यंत संवेदनशील ठरली. गत वर्षी मी पाहुणा म्हणून नियोजनाच्या आराखड्यात होतो. नव्याने तयार झालेला शिरूर विभाग माझ्याकडे असल्याने यावेळी मी यजमानाच्या भुमिकेत होतो. दडपण असले तरी एसपी अंकीत गोयल सरांच्या मार्गदर्शनाखाली चोख,नेटक्या, नियोजनबद्ध बंदोबस्ताचे शिवधनुष्य एकमेकांच्या समन्वयाने पेलले...पोलिसांच्या वाट्याला येणारा प्रत्येक दिवस एक नवे आव्हान घेऊन येतो...पण येणारे प्रत्येक आव्हान नवा अनुभव देऊन जाते... 31 डिसेंबरपुर्वी मलाही हे आव्हान वाटले होते , मात्र 1 जानेवारीच्या पहाटेपासून जिल्हा प्रशासन व पोलीस दलाने ज्या समन्वयाने कष्ट घेतले...तब्बल 40 तास सलगच्या सहनशिलतेमुळेच हे आव्हानाचे शिवधनुष्य अनुभवात बदलून गेले. यात समाधान देणारी बाब म्हणजे वरिष्ठांनी केलेले कौतूक...शिस्तबद्ध पोलीस दलात एखाद्या कामगिरीबद्दल झालेले कौतूक खूप प्रेरणादायी असते. हे कौतूक बंदोबस्तासाठी झटलेल्या प्रत्येक पोलीस अंमलदार आणि अधिकारी यांचे बळ वाढवणारे आहे...