Pune School College Reopen : पुण्यातील शाळा कॉलेज १ फेब्रुवारीपासून सुरू होणार

पुणे
रोहन जुवेकर
Updated Jan 29, 2022 | 16:44 IST

Pune School College Reopen From 1st February 2022 : पुणे जिल्ह्यातील शाळा कॉलेज मंगळवार १ फेब्रुवारी २०२२ पासून सुरू होणार आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री तसेच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी ही माहिती दिली.

Pune School College Reopen From 1st February 2022
पुण्यातील शाळा कॉलेज १ फेब्रुवारीपासून सुरू होणार  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • पुण्यातील शाळा कॉलेज १ फेब्रुवारीपासून सुरू होणार
  • पहिली ते आठवीचे वर्ग नियमित वेळेपेक्षा अर्धवेळ तर नववी आणि त्यापुढील सर्व वर्ग वेळापत्रकानुसार पूर्णवेळ सुरू राहतील
  • कोविड प्रोटोकॉल आणि मास्कसक्ती लागू

Pune School College Reopen From 1st February 2022 : पुणे : पुणे जिल्ह्यातील शाळा कॉलेज मंगळवार १ फेब्रुवारी २०२२ पासून सुरू होणार आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री तसेच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी ही माहिती दिली.

महाराष्ट्रातील बालवाड्या तसेच शाळा आणि कॉलेज सोमवार २४ जानेवारी २०२२ पासून सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने काही दिवसांपूर्वी घेतला. प्रशासनाला कोरोना संकटाचा आढावा घेऊन आवश्यकता भासल्यास स्थानिक पातळीवर शिक्षणसंस्था सुरू करण्याचा निर्णय लांबणीवर टाकण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले होते. यानंतर अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाची बैठक झाली. या बैठकीअंती पुणे जिल्ह्यातील शिक्षणसंस्था २४ जानेवारीला सुरू करायच्या नाही असे ठरले. आता पुन्हा एकदा कोरोना स्थितीचा आढावा घेतल्यानंतर पुणे जिल्ह्यातील शिक्षणसंस्था मंगळवार १ फेब्रुवारी २०२२ पासून सुरू करणार असल्याचे अजित पवार यांनी आज (शनिवार २९ जानेवारी २०२२) सांगितले.

पुणे जिल्ह्यात १ फेब्रुवारीपासून शिक्षणसंस्था सुरू होतील. पण त्यातही काही बंधने असतील. सर्व शिक्षणसंस्थांना कोविड प्रोटोकॉल पाळण्याचे बंधन असेल. जिल्ह्यातील सर्व पहिली ते आठवीचे वर्ग नियमित वेळेपेक्षा अर्धवेळ सुरू राहतील. तर नववी आणि त्यापुढील सर्व वर्ग वेळापत्रकानुसार पूर्णवेळ सुरू राहतील. पहिल्या आठवड्यात हा नियम संपूर्ण जिल्ह्यासाठी लागू आहे. यानंतर पुन्हा कोरोना स्थितीचा आढावा घेऊन जिल्हा प्रशासन पुढील सूचना देणार आहे. 

रविवार ३० जानेवारी आणि सोमवार ३१ जानेवारी रोजी पुणे जिल्ह्यातील सर्व शिक्षणसंस्थांमध्ये स्वच्छता केली जाईल. कोविड प्रोटोकॉलचे पालन करण्यासाठी आवश्यक तयारी केली जाईल. यानंतर मंगळवार १ फेब्रुवारी २०२२ पुणे जिल्ह्यातील सर्व शिक्षणसंस्था सुरू होणार आहेत. शिक्षणसंस्थेत अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी या सर्वांना मास्क घालणे बंधनकारक असेल; अशी माहिती अजित पवार यांनी दिली. अठरा वर्षांखालील मुलांना शिक्षणसंस्थेत ऑफलाइन शिक्षणासाठी येण्याकरिता पालकांकडून लेखी संमतीपत्र सोबत आणावे लागेल; असेही अजित पवार म्हणाले.

भारतात १५ आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या नागरिकांचे लसीकरण सुरू आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप लस घेतलेली नाही त्यांनी कोरोना प्रतिबंधक लस टोचून घ्यावी; असे आवाहन पालकमंत्री अजित पवार यांनी केले. आवश्यकता भासल्यास स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने नियोजन करून शिक्षणसंस्थांमध्ये विद्यार्थ्यांसाठी लसीकरण मोहीम राबवली जाईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी