Raj Thackeray: पुणे : मशीदींवरील भोंगे काढा अन्यथा दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावू असा इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला होता. तसेच लवकरच आपण अयोध्येचा दौरा करू असेही राज ठाकरे यांनी जाहीर केले होते. परंतु राज ठाकरे यांचे हिंदुत्व हे सोयीनुसार आणि सुपारीनुसार असतं अशा संदेश आणि त्यांनी काढलेले जुने व्यंगचित्रांचे पोस्टर पुण्यात लागले आहेत. (raj thackeray old cartoon posters in pune over hindutva)
राज ठाकरे यांच्या हिंदूत्वाच्या भूमिकेवरून महाविकास आघाडीतील नेत्यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका करायला सुरुवात केली आहे. त्यानंतर आता राज ठाकरे यांच्या जुन्या एका व्यंगचित्राचा आधार घेत त्यांच्या विरोधात पुण्यात पोस्टरबाजी करण्यात आली आहे. राज ठाकरे यांनी दोन वर्षापूर्वी एक व्यंगचित्र आपल्या समाज माध्यमावर प्रसिद्ध केले होतं. त्यामध्ये त्यांनी शिवसेना, विश्व हिंदू परिषद आणि भाजपाला लक्ष्य केले होते. त्या व्यंगचित्रावर, "अहो ! देश घातलाय खड्ड्यात आणि आता माझ्या नावाने गळा काढत आहात. अरे, लोकांनी तुमच्याकडे 'रामराज्य' मागितले होते "राम मंदिर" नव्हे. " असे लिहिले होते. याच व्यंगचित्राचा आधार घेत राज ठाकरे यांच्याविरोधात पुण्यातील गुडलक चौकात बॅनर लावण्यात आला आहे. त्या बॅनर वर लिहिण्यात आले की, "अशी वेळ कोणावरही येऊ नये . उद्धव साहेब ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याला आणि श्री राम मंदिराला विरोध करून व्यंगचित्र काढणारे राज ठाकरेंना शेवटी आयोध्येला जावेच लागणार आहे. सोयीनुसार आणि सुपारी नुसार पोकळ हिंदुत्व." असा मजकूर लिहीत राज ठाकरेंवर निशाणा साधण्यात आला आहे. दरम्यान, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे अयोध्येला जाणार असल्याचे समजते.
सदर व्यंगचित्र काढणारे 'राज ठाकरे'ते हेच का की मग दुसरे कोणी? असं ट्विट करत काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी देखील राज ठाकरे यांनी काढलेले एक व्यंगचित्र ट्विट करत राज ठाकरेंना जुन्या भूमिकेची आठवण करून दिली आहे.
मनसे चे अध्यक्ष राज ठाकरे अयोध्येला जाणार असल्याचे समजते.
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) April 18, 2022
सदर व्यंगचित्र काढणारे राज ठाकरे ते हेच का की मग दुसरे कोणी?🤔 pic.twitter.com/lrJFhyle9o