Sharmila Thackeray: पुणे: महाराष्ट्रातील (Maharashtra) रस्ते आणि त्यावरील खड्डे (Road potholes) हा प्रश्न राज्यात नेहमीच चर्चिला जातो. यावर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी देखील नाराजी व्यक्त केली. 'माझ्या नवऱ्याच्या हातात सत्ता येईल तेव्हाच राज्यातील रस्ते चांगले होतील.' असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. त्या पुण्यात (Pune) एका कार्यक्रमासाठी आल्या होत्या. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना शर्मिला ठाकरे यांनी हे वक्तव्य केले आहे. (raj thackerays wife sharmila thackeray believes that roads of maharashtra will improve only when my husband comes to power)
'महाराष्ट्र काय एवढा मागासलेला नाही. महाराष्ट्राची हद्द सोडली तर गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटक या सगळ्या राज्यातील बहुतांश सगळे रस्ते गुळगुळीत आहेत. मग आपल्या महाराष्ट्रातच अशी परिस्थिती का?' असा सवाल शर्मिला ठाकरे यांनी यावेळी विचारला आहे.
पाहा शर्मिला ठाकरे नेमकं काय म्हणाल्या:
'आपले राजकारणीच का मुद्दाम रस्ते चांगले करत नाहीत? तेवढे तरी नीट करा. आपण तर म्हणजे महाराष्ट्र देशाला सर्वात जास्त महसूल देतो. तर इथले निदान रस्ते तरी चांगले करा.' असा संताप शर्मिला ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
'माझ्या नवऱ्याच्या हातात जेव्हा सत्ता येईल तेव्हाच राज्यातील रस्ते चांगले होतील.' असं देखील शर्मिला ठाकरे यावेळी म्हणाल्या आहेत.
'तरुण पिढी राजकारणात आलीच पाहिजे'
'आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे हे दोघेही सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. या संदर्भात देखील शर्मिला ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्याच्या राजकरणात तरुण पिढी आलीच पाहिजे. तरुण पिढीकडे नवीन चांगले विचार असतात जुन्या विचाराने ते चालत नाहीत. त्यांच्या भरपूर अपेक्षा असतात त्यांच्या वयाच्या मुलांना काय हवं असतं हे त्यांना माहित असतं. जवळपास 60 ते 70 टक्के मतदार तरुण आहेत. त्यामुळे या मतदारांना काय हवंय हे या पिढीला कळतं म्हणून तरुण पिढीने राजकारणात यायला हवं.' असंही शर्मिला ठाकरे यावेळी म्हणाल्या.
दरवर्षी रस्त्यांची होते चाळण
दरम्यान, दरवर्षी पावसाळा सुरु होताच राज्यभरात रस्त्यांवरील खड्डे हा चर्चेचा विषय होऊन जातो. खरं म्हणजे यामुळे नागरिकांना प्रचंड मानसिक ताप सहन करावा लागतो. कारण याच खड्ड्यांमुळे अनेकदा तासन्तास ट्रॅफिकमध्ये अडकून पडावं लागतं. त्यातही गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या नागरिकांचे तर फारच हाल होतात. मात्र, तरीही यावर कोणताही ठोस उपाय गेल्या काही वर्षात निघालेला नाही. त्यामुळे सामान्य नागरिकांप्रमाणेच आता राजकारणी देखील याबाबत संताप व्यक्त करताना दिसत आहेत.
युद्धपातळीवर रस्त्यांची दुरुस्ती आणि वाहनांना टोलमाफी
गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गावर आता मोठ्या वेगाने रस्त्याचं काम सुरू आहे. ज्या ठिकाणी रस्ता खराब आहे त्या ठिकाणी राष्ट्रीय महामार्गावरील रस्ते दुरुस्ती युद्धपातळीवर करण्याच्या सूचना राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. तसेच मुंबई-पुणे-कोल्हापूर मार्गे कोकणात जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांना टोल माफी देण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वीच घेण्यात आला आहे.