Attack on Rohini Khadse रोहिणी खडसेंवर झालेल्या हल्ल्यानंतर रुपाली चाकणकरांचे ट्वीट , म्हणाल्या....

Rupali Chakankar's tweet after the attack on Rohini Khadse : रोहिणीताई खडसे यांच्या गाडीवर थोड्या वेळापुर्वी प्राणघातक हल्ला हल्लेखोरांनी केला, एक महिला सक्षमपणे मतदारसंघात काम करीत असताना असे भ्याड हल्ले करणारे निर्दोष सुटता कामा नये - रुपाली चाकणकर

Rupali Chakankar's tweet after the attack on Rohini Khadse
रोहिणी खडसेंवर झालेल्या हल्ल्यानंतर रुपाली चाकणकरांचे ट्वीट  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • एक महिला सक्षमपणे मतदारसंघात काम करीत असताना असे भ्याड हल्ले करणारे निर्दोष सुटता कामा नये - चाकणकर
  • रोहिणी खडसे आणि चालक सुखरूप बचावले असल्याची माहिती
  • दगडफेकीनंतर रॉडने रोहिणी खडसे यांच्या वाहनावर हल्ला केला

Attack on Rohini Khadse  जळगाव : बोदवड नगरपंचायत निवडणुकीनंतर राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे आणि आमदार चंद्रकांत पाटील यांच्यात सुरु झालेला वाद आता चांगलाच पेटणार असल्याचं दिसून येत आहे. कारण , राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे खेवळकर यांच्या चारचाकी वाहनावर अज्ञात इसमांनी दगडफेक केली असल्याची घटना घडली. या हल्यात गाडीच्या काचा फुटल्याचं दिसून येत आहे. सोमवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. रोहिणी खडसे यांच्या गाडीवर हल्ला करून या हल्लेखोर पळून गेले आहेत. सदर घटनेमुळे जळगावातील राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. सदर घटनेप्रकरणी राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी दखल घेत एक ट्वीट केलं आहे.

नेमकं काय रुपाली चाकणकर यांचे ट्वीट?

रोहिणीताई खडसे यांच्या गाडीवर थोड्या वेळापुर्वी प्राणघातक हल्ला हल्लेखोरांनी केला, एक महिला सक्षमपणे मतदारसंघात काम करीत असताना असे भ्याड हल्ले करणारे निर्दोष सुटता कामा नये ,मग ते कोणीही असो .जळगाव पोलिस अधीक्षकांनी तातडीने हल्लेखोरांचा तपास करुन कडक कारवाई करावी अशी विनंती राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केली आहे.

रोहिणी खडसे आणि चालक सुखरूप बचावले असल्याची माहिती

दरम्यान, रोहिणी खडसे यांच्या गाडीवर हल्ला करून हल्लेखोर अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पसार झाले असल्याची माहिती हाती आली आहे. तर , मागील आठवड्यापासून रोहिणी खडसे यांनी मुक्ताईनगर तालुक्यातील अवैध धंद्याविरोधात आवाज उठविला असल्याने त्यातून हा हल्ला झाला असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. रोहिणी खडसे आणि चालक सुखरूप बचावले असल्याची माहिती खडसे कुटुंबीयांकडून देण्यात आली आहे. 

दगडफेकीनंतर रॉडने रोहिणी खडसे यांच्या वाहनावर हल्ला केला

चांगदेव येथून एका हळदी समारंभ कार्यक्रम नंतर मुक्ताईनगरकडे रोहिणी खडसे या येत असताना सूतगिरणी परिसरात दोन मोटार सायकलवर आलेल्या चार अज्ञातांनी खडसे यांच्या गाडीवर अचानकपणे दगडफेक करण्यास सुरुवात केली. या दगडफेकीनंतर त्यांनी रॉडने रोहिणी खडसे यांच्या वाहनावर हल्ला केला. यावेळी वाहन चालकाने कार रस्त्यावरून बाजूला नेत रोहिणी खडसे यांच्यासह शेतात पलायन केल्याने त्यांना यामध्ये कुठलीही दुखापत झाली नाही.

आमदारांचे अवैध धंदे बंद करण्याचे जिल्हा पोलीस अधिक्षकांना निवेदन

आमदार चंद्रकांत पाटील यांचे अनेक अवैद्य धंदे असल्याचा आरोप खडसे यांनी केला आहे.  आमदारांचे अवैध धंदे बंद करण्याचे जिल्हा पोलीस अधिक्षकांना निवेदन दिले होते. त्यानुसार अवैध धंदे बंद होत असल्याने आमदारांनी जाणीवपूर्वक आरोप केल्याचं म्हणत माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. दरम्यान , महाविकासआघाडी सत्तेत एकत्र असले तरी स्थानिक पातळीवर नेत्यांचे वाद मात्र काही थांबताना दिसून येत नाही.  
शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला पदाधिकारी यांच्याशी असभ्य वर्तणूक करून विनयभंग केल्याचा आरोप
दरम्यान शनिवारी शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा पोलीस अधिक्षकांची भेट घेऊन रोहिणी खडसे खेवलकर यांच्यापासून आपल्या जीवाला धोका असल्याचा आरोप केला आहे. या तक्रारीनंतर मुक्ताईनगर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर ठेवलेल्या स्टेटस वरून पुन्हा वाद उफळला असून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला पदाधिकारी यांच्याशी असभ्य वर्तणूक करून विनयभंग केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करत २४ डिसेंबर रोजी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे. तर शिवसेनेच्या वतीने याबाबत परस्परविरोधी गुन्हा दाखल केला असल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी