इंदापूर: पश्चिम महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टीचे दिग्गज नेते हर्षवर्धन पाटील (bjp leader harshavardhan patil) आणि शिवसेना खासदार संजय राऊत (shivasena leader sanjay raut) या दोन्ही नेत्यांनी एकमेकांची गळाभेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत. हे दोन्ही नेते रविवारी इंदापुरात (indapur) एका खासगी कार्यक्रमासाठी गेले होते. दरम्यान, संजय राऊत आणि हर्षवर्धन पाटील यांच्या या गळा भेटीची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरु आहे.
हर्षवर्धन पाटील आणि संजय राऊत यांची गळाभेट झाल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीना प्रतिक्रिया दिली असून, हर्षवर्धन पाटील म्हणाले की, संजय राऊत हे आमचे जुने मित्र आहेत. आपल्याकडे पाहुणे आल्यावर आपण त्यांचे स्वागत करतो. आपल्याकडे गळाभेटीची पद्धत आहे. असं ते म्हणाले. इंदापूर तालुक्यातील अकोले येथे एका वास्तुशांतीच्या कार्यक्रमासाठी संजय राऊत यांनी हजेरी लावली होती. याठिकाणी भाजपचे नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हेदेखील उपस्थित होते. संजय राऊत येताच हर्षवर्धन पाटील यांनी त्यांची गळाभेट घेतली. आणि राजकीय चर्चा सुरु झाल्या.
काही दिवसांपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांची मुलगी कन्या पूर्वशी राऊत हिचा साखरपुडा होता. या साखरपुड्याला राज्यातील बड्या नेत्यांनी हजेरी लावली होती. त्यात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली होती. देवेंद्र फडणवीस येताच संजय राऊत यांनी समारंभाच्या व्यासपीठावर देवेंद्र फडणवीस यांची गळाभेट घेतली होती. त्यामुळे राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र, या गळाभेटीवर संजय राऊत यांनी देखील प्रतिक्रिया दिली होती. संजय राऊत म्हणाले होते की, फडणवीसांची गळाभेट घेतली. ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजलखानाची गळाभेट नव्हे. महाराष्ट्रात कोणी एकमेकांची गळाभेट घेत नाही का? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला होता. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या विचारधारेचे राजकीय नेते एकमेकांच्या घरी अशा समारंभांसाठी जात असतात. बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याच्या अनावरणावेळीही सर्व राजकीय पक्षांचे नेते उपस्थित होते. त्यामुळेच महाराष्ट्र हे संस्कृती आणि परंपरा असणारे राज्य म्हणून ओळखले जाते, असे संजय राऊत यांनी म्हटले होते.
हर्षवर्धन पाटील हे अनेक वर्ष कॉंग्रेस पक्षात होते मात्र, त्यांनी कॉंगेसला राम राम केल्यानंतर कॉंग्रेसवर मोठ्या प्रमाणात टीका केली होती. काँग्रेसने मला वाऱ्यावर सोडलं आणि मित्रपक्षांनी दिलेला शब्द पाळला नाही पण भाजपात मानसन्मान दिला जातो असे विधान हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलं होतं. काँग्रेसमधून जाताना मी काँग्रेसचे उपकार ठेवले नाहीत, मी उलट काँग्रेसवर उपकार करून आलोय. भाजपात दिलेला शब्द पाळला जातो तसेच फसवणूक होत नाही असे त्यांनी स्पष्ट केले. पाच वर्ष मी कुठल्या पदावर नव्हतो तरी पक्षासाठी खूप केलं. असेही त्यांनी म्हटलं होतं.