सीरम आगीची बातमी समजल्यानंतर पाहा काय म्हणाले अदर पुनावाला

पुणे
रोहित गोळे
Updated Jan 21, 2021 | 17:09 IST

सीरम इन्स्टिट्यूटला आग लागल्याचे वृत्त समजल्यानंतर संपूर्ण देशभरातून चिंता व्यक्त केली जात आहे. याचवेळी सीरमचे सीईओ अदर पुनावला यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

adar poonawalla
सीरम आगीची बातमी समजल्यानंतर पाहा काय म्हणाले अदर पुनावाला  |  फोटो सौजन्य: ANI

थोडं पण कामाचं

  • पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला भीषण आग
  • आगीत सीरम इन्स्टिट्यूटच्या एका इमारतीतील अनेक मजले जळून खाक
  • सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही

पुणे: पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला आग (Serum Institute Fire) लागल्याची बातमी काही क्षणात वाऱ्यासारखी सर्वदूर पसरली. जिथे कोरोनाची लस तयार केली जातेय त्या महत्त्वाच्या इन्स्टिट्यूला आग लागल्याचं समजताच सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला. कोरोनासारख्या साथीच्या आजाराने गेले वर्षभर धुमाकूळ घातला आहे. अखेर अनेक महिने कठोर परिश्रम करुन पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटने यावर लस (Corona Vaccine) तयार केली. १६ जानेवारीपासून देशभरात लसीकरण देखील सुरु झालं. पण त्याला अवघे काही दिवस होत नाही तोच या इन्स्टिट्यूटला आग लागली. त्यामुळे सुरुवातीला सर्वांनीच या घटनेप्रकरणी चिंता व्यक्त केली. 

सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. तसेच ज्या ठिकाणी कोरोनावरील लस बनविण्याचे काम सुरु होते ती इमारत देखील आग लागलेल्या इमारतीपासून दूर होती. त्यामुळे कोव्हिशिल्डला कोणतीही हानी पोहचलेली नाही. 

दरम्यान, या सगळ्या घटनेनंतर सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पुनावाला (CEO-Owner Adar Poonawalla) यांना आपली प्रतिक्रिया देताना असं म्हटलं आहे की, 'सर्वांनी या घटनेबाबत व्यक्त केलेली चिंता आणि केलेल्या प्रार्थना यासाठी सर्वांचेच आभार मानतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही किंवा कुणालाही गंभीर दुखापत झालेली नाही. फक्त आगीमध्ये काही मजले जळून खाक झाले आहेत.' 

 
भाजप आमदार मुक्ता टिळकांनी केली घातपाताची शक्यता व्यक्त

दुसरीकडे पुण्यातील भाजप आमदार मुक्ता टिळक यांनी सीरम इन्स्टिट्यूटला लागलेली आग हा घातपात आहे का? अशी शंका व्यक्त केली असल्याने आता एकच खळबळ माजली आहे. 

'आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास ही आग लागली असल्याची माहिती मला मिळाली. यावेळी सुदैवाने कोरोनावरील लस जिथे तयार होत आहे त्या इमारतीला आग लागली नाही. त्यामुळे मोठं संकट टळलं आहे. पण असं असलं तरी हा संपूर्ण प्रकार घातपात असल्याची दाट शंका मला वाटते आहे. कारण जिथे आग लागली त्या इमारतीपासून जवळच असणाऱ्या दुसऱ्या इमारतीत कोरोनावरील लस बनविण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे हा घातपात देखील असू शकतो.' असं आमदार मुक्ता टिळक म्हणाल्या. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी