पुणे: पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीला (Serum Institute building fire) आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास आग लागली. गेल्या काही दिवसांपासून सीरम इन्स्टिट्यूट खूपच चर्चेत आहे. कारण कोरोनासारख्या साथीच्या आजारावर याच इन्स्टिट्यूटने लस शोधून काढली आहे. तसेच देशात लसीकरण देखील सुरु झालं आहे. त्यामुळे येथे लागलेल्या आगीमुळे अनेकांना धक्का बसला आहे. त्यातच आता पुण्यातील भाजपच्या आमदार मुक्ता टिळक (BJP MLA Mukta Tilak) यांनी आता असा संशय व्यक्त केला आहे की, 'या आगीमागे घातपाताची शक्यता आहे का?.' त्यांच्या या शंकेमुळे आता या संपूर्ण घटनेला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे.
पाहा आमदार मुक्ता टिळक यांनी शंका व्यक्त केली
'आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास ही आग लागली असल्याची माहिती मला मिळाली. यावेळी सुदैवाने कोरोनावरील लस जिथे तयार होत आहे त्या इमारतीला आग लागली नाही. त्यामुळे मोठं संकट टळलं आहे. पण असं असलं तरी हा संपूर्ण प्रकार घातपात असल्याची दाट शंका मला वाटते आहे. कारण जिथे आग लागली त्या इमारतीपासून जवळच असणाऱ्या दुसऱ्या इमारतीत कोरोनावरील लस बनविण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे हा घातपात देखील असू शकतो.' असं आमदार मुक्ता टिळक म्हणाल्या.
दरम्यान, या आगीमध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, येथील एका इमारतीचं बरंचसं नुकसान मात्र झालं आहे. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून ते गेल्या अडीच तासापासून आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. ही आग नेमकी कशामुळे लागली आहे याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.
सीरमच्या इमारतीला लागलेली आग इतकी भीषण आहे की, धुराचे लोळ १५ ते २० फुटांपर्यंत उंच जात असताना दिसत आहेत. आगीने काही क्षणांतच रौद्र रुप धारण केलं आणि ही आग इमारतीच्या इतर मजल्यांवरही पसरली आहे.
पुण्यातील मांजरी येथे सीरम इन्स्टिट्यूटची नवीन इमारत तयार करण्यात आली आहे आणि त्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर ही आग लागली आहे. मात्र, कोरोनावरील लस निर्मितीचे काम दुसऱ्या इमारतीत सुरू आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या संपर्कात आहेत आणि संपूर्ण परिस्थितीची माहिती घेत आहेत. आवश्यक ती सर्व यंत्रणा वापरुन आणि या यंत्रणेसोबत समन्वय साधून परिस्थिती नियंत्रणात करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
कोविड-१९ (Covid-19) या संसर्गावर सीरम इन्स्टिट्यूट लस निर्मिती करत आहे. सीरम इन्स्टिट्यूटने तयार केलेली 'कोव्हिशिल्ड' लस (Covishield vaccine) संपूर्ण देशभरात वितरित करण्यात आली असून आरोग्य सेवकांना या लीसीचे डोसही दिले जात आहे. सीरम इन्स्टिट्यूटमध्ये अद्यापही लसींचे डोस तयार करण्याचे काम सुरू आहे. तसेच सीरम इन्स्टिट्यूटने तयार केलेल्या कोव्हिशिल्ड लसीचे डोस शेजारील देशांनाही पाठवण्यात येत आहेत. त्यामुळे सीरम इन्स्टिट्यूट ही देशातील एक खूपच महत्वाची इन्स्टिट्यूट आहे.