Thackeray Vs Shinde : मै झुकेगा नही! शिवसेनेचा आक्रमक पवित्रा, शिंदेंच्या बंडानंतर साफसफाई आणि हकालपट्टीचे सत्र

शिवसेनेनं पुन्हा नव्याने पक्षाची बांधणी करण्याचा निर्धार केला असून शिंदे गटाशी सलगी दाखवणाऱ्या नेत्यांना सरळ बाहेरचा रस्ता दाखवला जात असल्याचं चित्र आहे. माजी खासदार आणि शिवेसना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हकालपट्टीतून शिवसेनेनं इतर नेत्यांना मोठा संदेश दिला आहे.

Thackeray Vs Shinde
माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची शिवसेनेतून हकालपट्टी  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • शिवाजीराव आढळराव पाटील यांची पक्षातून हकालपट्टी
  • शिंदे गटाशी दाखवलेली सलगी भोवली
  • शिवसेनेकडून जोरदार साफसफाई

Thackeray Vs Shinde | महाराष्ट्राच्या राजकारणात झालेल्या उलथापालथीनंतर शिवसेनेनं पक्षातील साफसफाई कऱण्याचं काम सुरूच ठेवलं आहे. कुठलीही तडजोड न करता पुन्हा नव्याने पक्षाची उभारणी करण्याचे इरादे शिवसेनेनं स्पष्ट केले आहेत. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची पक्षानं हकालपट्टी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत सलगी दाखवण्याचा प्रयत्न शिवाजीराव आढळराव यांना चांगलाच भोवला आहे. महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री हे शिवसेनेचे नाहीत, अशी घोषणा करून उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचे इरादे स्पष्ट केले होते. कुठल्याही प्रकारची तडजोड करायला शिवसेना तयार नसल्याचं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं असून राज्यातील दिग्गज नेत्यांवरही कारवाई करायला आपण मागेपुढे पाहणार नसल्याचे संकेतच उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. 

नव्याने करणार पक्षबांधणी

मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर पक्षाची बांधणी पुन्हा नव्याने कऱणार असल्याचे संकेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले होते. यापुढे स्वतः शिवसेना भवनात बसून पक्ष बांधणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर शिवसेनेनं जनाधार असणाऱ्या ज्येष्ठ नेत्यांनाही नारळ द्यायला सुरुवात केली असून शिंदे गटासोबत संबंध आणि सलगी ठेवणं खपवून घेतलं जाणार नसल्याचे संकेत दिले आहेत. 

अधिक वाचा - शिंदे गटानेही आदित्यसह 16 आमदारांना बजावला व्हीप

या पोस्टमुळे कारवाई झाल्याची चर्चा

शिवसेनेतून बंड करून बाहेर पडलेले एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना अनेकांनी शुभेच्छा दिल्या. काहींनी केवळ औपचारिकता आणि शिष्टाचाराचा भाग म्हणून शुभेच्छा दिल्या तर काहीजणांनी शिंंदे यांच्यासोबत आपली किती जवळीक आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न या निमित्ताने केला. आढळरावांनीदेखील शुभेच्छा देताना ज्या प्रकारची पोस्ट तयार केली, त्यावरून ते शिंदे गटाशी सलगी साधत असल्याचा संदेश जात असल्याचं शिवसेनेचं म्हणणं होतं. या पोस्टमध्ये आढळराव पाटील यांनी स्वतःसोबत एकनाथ शिंदेंचा फोटो वापरला होता. महत्त्वाचं म्हणजे त्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा फोटो वापऱण्यात आला नव्हता. या फोटोसोबत त्यांनी लिहिलेला संदेशही शिवसेनेला दुखावणारा होता. ‘गर्जत राहिल आवाज हिंदुत्वाचा, अभिनंदन मुख्यमंत्री साहेब’ असा संदेश त्यावर लिहिण्यात आला होता. या सर्व बाबी लक्षात घेऊन शिवाजीराव आढळराव पाटील यांनी एकनाथ शिंदेंसोबत सलगी करण्याचा प्रयत्न केल्याचं स्पष्ट होत असल्यामुळेच त्यांच्यावर कारवाई कऱण्यात आल्याचं मानलं जात आहे. 

ज्येष्ठ नेत्याची हकालपट्टी

शिवाजीराव आढळऱाव पाटील हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत. 2004 साली ते पहिल्यांदा शिवसेनेच्या तिकीटावर खासदार म्हणून निवडून आले. त्यानंतर सलग 2009 आणि 2014 च्या निवडणुकीतही ते खासदार म्हणून निवडून आले. सलग 15 वर्षे खासदार राहण्याचा बहुमान त्यांनी मिळवला आहे. त्यानंतर गेल्या लोकसभा निवडणुकीतही त्यांना शिवसेनेनं उमेदवारी दिली होती. मात्र त्यावेळी त्यांचा पराभव झाला आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. अमोल कोल्हे हे त्यांच्या शिरूर लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले होते. 

अधिक वाचा - धक्कातंत्राच्या घातक ट्रेंडपासून सावधान

पुढे काय होणार?

शिंदे गटासोबत जाणाऱ्या आणि त्यांच्याशी सलगी ठेवणाऱ्या प्रत्येकाची हकालपट्टी कऱण्याचं धोरण सध्या शिवसेनेनं राबवलं आहे. त्यामुळे शिवसेनेतील नेत्यांची संख्या कमी होऊन शिंदे गटाची ताकद वाढत असल्याचं चित्र आहे. मात्र भविष्यात शिवसेना तरुण रक्तासह पुन्हा नव्याने उभी राहिल, असा पण उद्धव ठाकरेंनी केला आहे. आता शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासोबत किती कार्यकर्ते शिंदे गटात जाणार आणि किती राहणार, हे लवकरच समजेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी