Babasaheb Purandare : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे पुण्यात निधन

पुणे
भरत जाधव
Updated Nov 15, 2021 | 21:36 IST

Shivshahir Babasaheb Purandare passed away : छत्रपती शिवाजी महाराज (chhatrapati sambhaji maharaj) यांचे चरित्र महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचवणारे महाराष्ट्र भूषण आणि शिवशाहीर (Maharashtra Bhushan and Shivshahir) बाबासाहेब पुरंदरे (babasaheb purandare) यांचे आज निधन झाले आहे.

Shivshahir Babasaheb Purandare passed away in Pune
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे पुण्यात निधन  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • सकाळी साडेदहा वाजता वैकुंठ स्मशानभूमीत बाबासाहेब पुरंदरेंच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
  • बाबासाहेब पुरंदरे यांचे मूळ नाव बळवंत मोरोपंत पुरंदरे होते. त्यांचा जन्म 29 जुलै 1922 रोजी झाला होता
  • पुरंदरे यांनी लिहिलेल्या जाणता राजा या महानाट्याचे राज्यभरात हजारो प्रयोग झाले.

Shivshahir Babasaheb Purandare passed away : पुणे :  छत्रपती शिवाजी महाराज (chhatrapati sambhaji maharaj) यांचे चरित्र महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचवणारे महाराष्ट्र भूषण आणि शिवशाहीर (Maharashtra Bhushan and Shivshahir) बाबासाहेब पुरंदरे (babasaheb purandare) यांचे आज निधन झाले. वयाच्या 100 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात (Dinanath Mangeshkar Hospital) बाबासाहेब पुरंदरेंवर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत माळवली. 

हाती आलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपुर्वी घरात पाय घसरून पडल्याने बाबासाहेब पुरंदरेंच्या डोक्याला मार लागला होता, त्यानंतर त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास त्यांना न्यूमोनिया झाला असून प्रकृती खालावली असल्याची माहिती अधिकृतपणे रुग्णालयाच्यावतीने देण्यात आली होती. मात्र, रुग्णालयात मृत्यूशी सुरू असलेली त्यांची झुंज अपयशी ठरली. साडेआठ वाजता पार्थिव पर्वती इथल्या निवासस्थानी ठेवण्यात येईल आणि सकाळी साडेदहा वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

बाबासाहेब पुरंदरे यांचे मूळ नाव बळवंत मोरोपंत पुरंदरे होते. त्यांचा जन्म 29 जुलै 1922 रोजी झाला होता. त्यांच्यावर असलेल्या प्रेमापोटी, आदराने त्यांना बाबासाहेब पुरंदरे असे म्हटले जाऊ लागले. जवळपास सात दशके त्यांनी इतिहास संशोधनाचे कार्य केले. पहिल्यांदा ते 1941 मध्ये भारत इतिहास संशोधक मंडळात सहभागी झाले होते. इतिहाससंशोधक ग. ह. खरे यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले होते. पुणे विद्यापीठाच्या ’मराठा इतिहासाची शकावली- सन 1740 ते 1764 ’ या भारत इतिहास संशोधन मंडळात झालेल्या संशोधन प्रकल्पात बाबासाहेब पुरंदरे संशोधक म्हणून सहभागी झाले होते. बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवचरित्रावर देश-विदेशात सुमारे 12 हजारांपेक्षा अधिक व्याख्याने दिली आहेत. 

सन 2015 मध्ये महाराष्ट्र सरकारने राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार 'महाराष्ट्र भूषण' देऊन त्यांचा गौरव केला होता. बाबासाहेब पुरंदरे यांनी महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचा आणि मराठा साम्राज्य आणि शिवकालीन ऐतिहासिक दस्तऐवजांचा सखोल अभ्यास केला होता. इतिहास संशोधनात केलेल्या कार्याची दखल घेत त्यांचा पद्मविभूषण पुरस्काराने गौरव करण्यात आला होता.

बाबासाहेब पुरंदरे यांची साहित्य संपदा

बाबासाहेब पुरंदरे यांनी मुख्यत्वे ऐतिहासिक विषयांवर वर्णनात्मक लेखन केले. त्याशिवाय, ललित कादंबरी लेखन, नाट्यलेखनही केले. 'जाणता राजा' या ऐतिहासिक गाजलेल्या नाटकाचे दिग्दर्शन केले. 'सावित्री', 'जाळत्या ठिणग्या', 'मुजऱ्याचे मानकरी', 'राजा शिवछत्रपती', 'महाराज', 'शेलारखिंड', 'पुरंदऱ्यांचा सरकारवाडा', 'शनिवारवाड्यातील शमादान', 'शिलंगणाचं सोनं', 'पुरंदरच्या बुरुजावरून', 'कलावंतिणीचा सज्जा', 'महाराजांची राजचिन्हे', 'पुरंदऱ्यांची नौबत' आदी साहित्य प्रकाशित झाले आहे. 

राजा शिवछत्रपती या ग्रंथाच्या 16 आवृत्ती प्रकाशित झाल्या असून 5 लाखांहून अधिक प्रती प्रकाशित झाल्या आहेत. तर पुरंदरे यांनी लिहिलेल्या जाणता राजा या महानाट्याचे राज्यभरात हजारो प्रयोग झाले. तब्बल 27 वर्षांत 1250 हून जास्त प्रयोग झाले. या नाटकाचे हिंदी आणि इंग्रजीसह इतर 5 भाषांमध्ये भाषांतर झाले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी