Rohit Pawar Tweet : राजकारणात सोडावंस वाटतंय, पण….! संजय राऊत अटकसत्र पाहून रोहित पवारांचं उद्विग्न ट्विट

पुणे
उमेर सय्यद
Updated Aug 01, 2022 | 16:20 IST

महाराष्ट्रात आणि देशात सध्या सुरु असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आमदार रोहित पवार यांनी एक ट्विट केलं आहे. कधीकधी राजकारण सोडावंसं वाटत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

Rohit Pawar Tweet
राजकारण सोडावंस वाटतंय - रोहित पवार  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • कधीकधी वाटतं राजकारण सोडावं
  • रोहित पवारांचे उद्विग्न ट्विट
  • तरुणच चित्र बदलून शकत असल्याचाही विचार

Rohit Pawar Tweet : शिवसेना खासदार संजय राऊत यांना ताब्यात घेणे, चौकशी करणे आणि त्यानंतर झालेली अटक या रविवारी घडलेल्या घडामोडींनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी उद्विग्न प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आपली राजकारण सोडण्याची कधीकधी इच्छा होते आणि दिवसभरातील घटना पाहिल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी जे म्हणाले होते, त्याची आठवण होते, अशा आशयाचं ट्विट त्यांनी केलं आहे. या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चांना सुरुवात झाली आहे. 

काय म्हणाले रोहित पवार?

शनिवारी दिवसभऱ राज्यपालांच्या मुंबईबाबतच्या विधानावरून उमटलेले पडसाद आणि त्यानंतर रविवारी दिवसभर संजय राऊत यांच्या चौकशी आणि अटकेचं नाट्य पाहता राजकारण सोडून देण्याची इच्छा होते, अशा भावना रोहित पवार यांनी व्यक्त केल्या. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, “आज दिवसभरातील राजकीय घडामोडी बघून आठवड्याभरापूर्वी मा. गडकरी साहेबांनी राजकारण सोडण्यासंदर्भात जी भावना बोलून दाखवली होती, तशीच भावना आज माझीही झालीय. परंतु अशी परिस्थिती बदलण्याची ताकद युवांमध्ये असल्याने त्यांच्याकडं पाहून बळ मिळतं!”

दुसऱ्या फळीतील नेत्यांच्या भावना

रोहित पवार दुसऱ्या फळीतील नेत्यांच्या भावनाच आपल्या ट्विटमधून मांडत असल्याची चर्चा आहे. सध्या ईडीचा गैरवापर विरोधकांचा आवाज दाबवण्यासाठी केला जात असल्याच आरोप राष्ट्रवादी काँग्रेसकडून वारंवार करण्यात आला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांना अटक झाल्यानंतर तर अत्यंत निर्दयी राजकारण सुरू असल्याची भावना महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळातून व्यक्त होत असताना रोहित पवारांनी त्याच भावनेला वाचा फोडण्याचा प्रयत्न केल्याचं सांगितलं जात आहे. 

अधिक वाचा - Ashok Chavan :माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण कॉंग्रेस सोडण्याच्या तयारीत? 'हे' असून शकत कारण, मात्र......

लढण्याचा निर्धार

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विधानाचा संदर्भ देत रोहित पवार यांनी हे ट्विट केलं असलं तरी त्याच्या उत्तरार्धात लढण्याचा इरादाही व्यक्त केला आहे. अशी परिस्थिती बदलण्याची ताकद युवांमध्ये असल्याचं सांगत त्यांनी आपले भविष्यातील इरादेही स्पष्ट केल्याचं सांगितलं जात आहे.

अधिक वाचा - Sunil Raut: संजय राऊतांना अटक, दुसऱ्या राऊतांनी सुरू ठेवला पत्रकार परिषदेचा सिलसिला

राजकारण्यांच्या ट्विटचे अर्थ

राजकीय नेते ज्या प्रतिक्रिया व्यक्त करतात, त्यातून अनेक प्रकारचे अर्थ राजकीय विश्लेषकांकडून काढले जातात. रोहित पवारांच्या या ट्विटवरून राष्ट्रवादी काँग्रेस कुठल्याही दबावाला बळी न पडता राज्यातील विरोधी पक्ष म्हणून आपली कामगिरी चोख बजावणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्याचप्रमाणे संजय राऊत यांना ईडीने अटक केल्यानंतर महाराष्ट्रातील इतर पक्ष आणि त्यांचे नेते दबावाखाली येतील काय, या चर्चेलाही त्यांनी उत्तर दिल्याचं समजलं जात आहे. अशा दबावाला बळी न पडण्याचं आवाहनच रोहित पवारांनी या ट्विटमधून केल्याचं सांगितलं जात आहे. सध्या सुरु असलेल्या राजकारणाचा निषेध करणं आणि दबावाला बळी पडणार नसल्याचा संदेश देणं, हे दुहेरी उद्देश रोहित पवारांनी या ट्विटरमधून साध्य केल्याचं बोललं जात आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी