पुण्याच्या शुभम जाधव नावाच्या विद्यार्थ्याने दहावीच्या परीक्षेत सर्व विषयात 35 मार्क्स मिळवले आहेत. ना कमी ना जास्त. पास होण्यासाठी जेवढे गरजेचे आहेत तेवढेच. त्यामुळे शुभमची मार्कशीट इतरांपेक्षा फारच वेगळी आणि लक्षणीय ठरते आहे. शुभमलाही या निकालाचा आनंद झाला असून आपण दहावी पास झाल्याबद्दल त्याने आनंद साजरा केला.
शुभम हा गरीब कुटुंबात वाढलेला विद्यार्थी असून कष्टाची कामे करत त्यानं आपलं शिक्षण पूर्ण केलं. पैसे कमावण्यासाठी तो लहानपाणापासून हार्डवेअरच्या दुकानात काम करत होता. शिक्षण थांबू न देणं एवढंच त्याचं उद्दिष्ट होतं. मात्र रोजच्या कामामुळे इतर मुलांच्या तुलनेत त्याला अभ्यास करण्यासाठी फारच कमी वेळ मिळत असे. तरीही चिकाटीने अभ्यास करून त्याने हे यश मिळवलं आहे. त्याला मिळालेल्या गुणांमध्ये तो समाधानी आहे आणि बारावीला यापेक्षा अधिक अभ्यास करू आणि अधिक गुण मिळवण्याचा प्रयत्न करू, असा चंग त्याने बांधला आहे.
शुभमला लहानपणापासून खेळाची आवड आहे. घराशेजारी असणाऱ्या मैदानात किंवा मोकळ्या जागेत मित्रांसोबत तासनतान खेळणं हा लहानपणापासूनचा त्याचा छंद. नंतर हार्डवेअरच्या दुकानात काम करायला लागल्यापासून त्याला खेळायला वेळ मिळेनासा झाला. मात्र तरीही शक्य तेव्हा वेळ काढून आपली खेळण्याची हौस तो भागवतो.
आघिक वाचा - एक डाऊट अन् तीन जण आऊट! प्रेयसीचा घोठला गळा, दोन चिमुरड्यांना मारलं विहिरीत बुडवून
अनेकदा कमी गुण मिळाले म्हणून खट्टू होऊन बसणारे अनेक विद्यार्थी आपण आजूबाजूला पाहतो. मात्र शुभम मात्र कधीच निराश होत नाही. जग कसं चालतं, याचा अनुभव त्याने कमी वयातच घेतला आहे. त्यामुळे आपण पास झालो, यातच त्याला समाधान आहे. अनेकदा 70 किंवा 80 टक्के गुण मिळालेले विद्यार्थी 90 टक्के मिळालेल्यांशी तुलना करून वाईट वाटून घेत असतात. मात्र शुभमनं आपला आनंद जाहीररित्या व्यक्त करून इतर मुलांनाही समाधानी कसं राहावं, याचा संदेश दिला आहे.