TET Exam | टीईटी परीक्षा घोटाळा मोठी बातमी ; 'या' वर्षाच्या परीक्षेतही मोठा गैरव्यवहार झाल्याचा पुणे पोलिसांना संशय

TET Exam Scam big update ; राज्य सरकारच्या चौकशी समितीकडून देखील टीईटी परीक्षा गैरव्यवहार प्रकरणात कसून चौकशी केली जात आहे. टीईटी परीक्षा गैरप्रकारातील सविस्तर माहिती गोळा करण्याचे काम समिती करत आहे

TET Exam Scam big update
'या' वर्षाच्या परीक्षेतही मोठा गैरव्यवहार झाल्याचा संशय   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • विनर कंपनीला दिलेल्या कामाच्या संदर्भात कंपनीची काही कागदपत्रे ताब्यात घेऊन तपास केला जाणार
  • टीईटी परीक्षा गैरप्रकारातील सविस्तर माहिती संकलित करण्याचे काम समिती करत आहे
  • २०१७  मध्ये ज्या कंपन्या होत्या त्यांनाच काम दिल्याचा दावा सुपेने केला आहे

TET Exam Scam  : पुणे : २०२१  च्या टीईटी परीक्षेत (TET Exam)  मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचा संशय आता पुणे पोलिसांनी व्यक्त केला आहे. २०१८ या वर्षी आणि २०२० च्या टीईटी परीक्षेत गैरप्रकार झाल्यानंतर पुणे पोलिसांना (Pune Cyber Police) २०२१ च्या परीक्षेतही गैरप्रकार झाल्याचा संशय आहे. त्यामुळे पुणे पोलीस आता याअनुषंगाने देखील चौकशी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात येणारी शिक्षक पात्रता परीक्षा (TET) म्हणजेच टीईटी परीक्षेत गैरप्रकार (TET Exam Scam) झाल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली असून यामध्ये पोलिसांनी योग्य तपास करत अनेकांना बेड्या ठोकल्या. दरम्यान, पोलीस अधिक तपास करत असून, राज्य सरकारच्या समितीकडून देखील महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची कसून चौकशी करण्यात येत आहे. २०१८ व २०२० च्या टीईटी परीक्षेत गैरव्यवहार केल्या प्रकरणी सध्या तुकाराम सुपे, सुखदेव डेरे याच्यासह आणखी काहीजण अटकेत आहेत.

विनर कंपनीला दिलेल्या कामाच्या संदर्भात कंपनीची काही कागदपत्रे ताब्यात घेऊन तपास केला जाणार

२०२१  च्या परीक्षा आयोजनाचं ज्या विनर कंपनीकडे होते त्या कंपनीच्या सौरभ तिवारी याला देखील पोलिसांनी अटक केली आहे. विनर कंपनीला दिलेल्या कामाच्या संदर्भात कंपनीची काही कागदपत्रे ताब्यात घेऊन तपास केला जाणार असल्याची माहिती आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतील काही अधिकारी ,कर्मचाऱ्यांची चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.

टीईटी परीक्षा गैरप्रकारातील सविस्तर माहिती संकलित करण्याचे काम समिती करत आहे

राज्य सरकारच्या चौकशी समितीकडून देखील टीईटी परीक्षा गैरव्यवहार प्रकरणात कसून चौकशी केली जात आहे. टीईटी परीक्षा गैरप्रकारातील सविस्तर माहिती गोळा करण्याचे काम समिती करत आहे. चौकशी समितीचा अहवाल १५ दिवसात सादर होणार असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, राज्य सरकार देखील टीईटी परीक्षेतील गैरप्रकार समोर आल्यानंतर खडबडून जागं झालं आहे. सदर प्रकरणात अटक असलेल्या तुकाराम सुपे याला निलंबित करण्यात आलं असून चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. टीईटी परीक्षा प्रकरणात आतापर्यंतच्या तपासात ९०० विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचा पुणे पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. 

२०१७  मध्ये ज्या कंपन्या होत्या त्यांनाच काम दिल्याचा दावा सुपेने केला आहे

२०१७ मध्ये ज्या कंपन्या होत्या त्यांनाच काम दिल्याचा दावा सुपेने केला आहे. २०१७ ला या कंपन्यांना कुणी आणल्या याचा तपास झाला तर सगळे हाती लागतील, असंही सुपेने म्हटलं आहे. पोलीस खोलपर्यंत तपास करणार का? मी तपासात संपूर्ण सहकार्य करतोय. मा मला बळीचा बकरा केलं जातं असून यामध्ये अजून काही लोकं आहेत. अशी माहिती तुकाराम सुपे यांचे वकील मिलिंद पवार यांनी दिली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी