बारामती : प्रत्येक व्यक्तीला कधी न कधी बँकेत जाण्याचा गरज भासतेचं. जर आपण बँकेत गेला असाल तर आपण कंटाळल्याशिवाय राहणार नाही. कारण बँकेचा कारभार हा एकदम धिम्या गतीने सुरु असतो. त्यामुळे याची चीड प्रत्येक नागरिकांना येतेच. मात्र, आपण त्याठिकाणी शांत राहतो. बारामतीत मात्र बँकेच्या एका खातेदाराने बँक खात्यातून गेलेल्या पैशांच्या तक्रारीवर अधिकाऱ्यांकडून योग्य ती दखल घेतली न गेल्यामुळे थेट बॅंकलाच कुलुप ठोकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे बँक कर्मचारी यावेळी बँकेतच अडकून होते. हा सर्व प्रकार बारामती तालुक्यातील एका बँकेत घडला आहे. सदर घटनेनंतर मोठा गोंधळ उडाल्याचं पहायला मिळालं होत. या सर्व प्रकारानंतर कुलूप लावणाऱ्यावर कामकाजात अडथळा आणल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
मिळालेल्या महितीनुसार सदर घटना ही बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे बुद्रुक या गावात घडली आहे. बँकेला टाळे ठोकणाऱ्या बँक खातेदाराचे नाव राजेद्र रामचंद्र थोपटे असं आहे. राजेद्र रामचंद्र थोपटे यांचे युनियन बँक आँफ इंडिया शाखा कोऱ्हाळे बुद्रुक येथे खाते आहे. त्यांच्या या खात्यातून दोन वेळा एटीएमद्वारे अज्ञाताने २० हजार रुपये रक्कम काढली. थोपटे यांनी एटीएम लोकेशनवरुन याबाबत काही माहिती मिळाली का? अशी विचारणा बँकेच्या अधिकाऱ्यांना केली. मात्र, बँक अधिकाऱ्यांनी त्यांना हवे तसे उत्तर दिले नाही. त्यामुळे थोपटे यांना प्रचंड राग आला आणि त्यांनी बँकेचे बाहेर असलेले लोंखडी गेट बंद करत त्याला कुलुप लावून बँकेतील कर्मचाऱ्यांना आत कोंडून ठेवले. दरम्यान या सर्व प्रकारानंतर थोपटे यांच्यावर कामकाजात अडथळा आणल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. खातेदार राजेंद्र थोपटे हे माजी सैनिक आहेत.
थोपटे यांनी अचानकपणे बाहेर येत थेट बँकेला कुलूप लावल्याने बँकेतील सर्व कर्मचारी आणि बँकेत विचिध कामासाठी आलेले खातेदार चक्क बँकेत अडकून पडले. या सर्व प्रकाराबाबत पोलिसांना माहिती मिळताच ते बँकेत आले. घडलेल्या सर्व प्रकाराची माहिती घेऊन बँक कर्मचारी आणि आत अडकलेल्या खातेदारांची पोलिसांनी सुटका केली. बँकेचे व्यवहार थांबवून बँकेच्या कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा थोपटे यांच्याविरुद्ध नोंदवण्यात आला आहे.