सांगली: इंजिनिअर होऊन मोठ्या कंपनीत नोकरी लागल्याने मित्रांना पार्टी देणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले. जत जवळील बिरनाळ फाटयाजवळ शनिवारी मध्यरात्री मोटार सायकलवरील ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात एकाच मोटार सायकलवर निघालेल्या चौघांपैकी तिघांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. अपघातात मृत्यू पावलेले तिघे व जखमी जत तालुक्यातील कोसारी येथीलच रहिवाशी आहे. या घटनेमुळे कोसारी गावात शोककळा पसरली असून तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
या अपघातात अजित नेताजी भोसले (वय- २४), याचा जागीच मृत्यू झाला तर मोहित शिवाजी तोरवे (वय -२०) व राजेंद्र संजय भाले (वय -२१) या दोघांना उपचारासाठी जत ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या अपघातात संग्राम विक्रम तोरवे (वय- १६) हा तरुण गंभीर जखमी झाला आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, कोसारी येथील अजित भोसले, मोहित तोरवे, राजेंद्र भाले व संग्राम तोरवे हे चौघे मित्र. मोहित तोरवे हा पंधरा दिवसापूर्वी जत येथे एका मायक्रोसॉफ्ट कंपनीत कामाला लागला. रात्री उशिरा झाल्याने त्याने गावातील मित्र अजित भोसले, राजेंद्र भाले व संग्राम तोरवे यांना फोन करून जतला बोलावून घेतले. अजित, राजेंद्र व संग्राम हे तिघेही गावात एकाच्या घरी सोळावीचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमात जेवण करून मोहित तोरवेला आणण्यासाठी हे तिघेही दुचाकी घेऊन जतला आले. जत मध्ये येऊन चारी जणांनी जेवण केलं. रात्री साडेदहा वाजता अजित भोसले, राजेंद्र भाले, संग्राम तोरवे व मोहित तोरवे हे एकाच मोटार सायकलवर गावी कोसरीकडे निघाले.
अजित भोसले हा गाडी चालवत होता. विजापूर-गुहागर या राष्ट्रीय महामार्गाचे काम सध्या सुरू आहे. त्यांची दुचाकी भरधाव वेगात होती, बिरनाळ फाट्याजवळ आल्यानंतर त्यांच्या मोटारसायकलचा ताबा सुटला व दगडाला धडक देवून मोटार सायकल बाजूला जावून पडली. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला.