पुणे : पुण्यात पुन्हा एका टिकटॉक स्टारने (tik tok star) आत्महत्या (suicide) केली आहे. समीर गायकवाड (sameer gaikwad) असे आत्महत्या करणाऱ्या टिकटॉक स्टारचे नाव आहे. समीरने रविवारी २१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आपले जीवन संपविले आहे. समीर गायकवाड याने प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याची चर्चा सर्वत्र होत असून, त्याच्या जाण्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
समीर गायकवाड याने गळफास घेतल्याचे समजल्यावर त्याला खाली उतरवण्यात आले. तातडीने समीर गायकवाडला नजीकच्या लाईफ लाईन हॉस्पिटलला नेण्यात आले होते. लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये, डॉक्टरांनी समीर गायकवाडची तपासणी केली. उपचारापूर्वीच समीरचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सदर घटना ही रविवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. समीर याचा भाऊ प्रफुल्ल रोहिदास गायकवाड यांनी घटनेची माहिती लोणीकंद पोलिसांना दिली. समीर मनीष गायकवाड (वय २२, रा. निकासा सोसायटी, केसनंद रोड, वाघोली) पुणे शहरातील वाघोली येथे राहत होता. त्याने आपल्या राहत्या घरीच पंख्याला साडी बांधली. साडीच्या मदतीने गळफास घेतला आणि जीवन संपवले.
समीर गायाकवाड या टिकटॉक स्टारने नेमकी आत्महत्या का केली? त्याच्या आत्महत्येमागील नेमके कारण काय हे अद्याप समोर आले नाही. कारण समीर गायकवाडने आत्महत्येपूर्वी कोणतीही चिठ्ठी लिहिल्याचे घरात आढळून आले नाही. या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.
समीर गायकवाड हा युवक म्युझिक व्हिडिओ आणि शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून तरुणांच्या गळ्यातील ताईत बनला होता. तसेच समीर हा ब्लॉगर म्हणून देखील तरुणाईमध्ये लोकप्रिय होता. तो पुण्यातील वाडिया कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता. त्याची रेडलाईट डायरीज ही ब्लॉगवरील मालिका चांगलीच गाजली होती. त्याच्या जाण्याने मित्र वर्गामध्ये हळह्ळ व्यक्त केली जात आहे. लोणीकंद पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी तपास पूर्ण झाल्यानंतरच माहिती देऊ असे जाहीर केले.
काही दिवसांपूर्वीच बीड जिल्ह्यातील परळी येथील रहिवासी असलेल्या पूजा चव्हाण या तरुणीने इमारतीवरून उडी मारत आत्महत्या केली होती. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण हे राज्यात मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय बनले आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात महाराष्ट्रातील एका मंत्र्याचे नाव आल्याने उलटसुलट राजकीय चर्चा जोरात सुरू आहे.
पूजा चव्हाणने इमारतीच्या पहिल्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. तिच्या डोक्याला आणि मणक्याला गंभीर दुखापत झाली असल्याचे समोर आले. पूजाचे बीएचं शिक्षण पूर्ण झालं होतं. पूजा तिच्या चुलत भाऊ आणि एका मित्रासोबत पुण्यात राहत होती. पुण्यात ती स्पोकन इंग्लिशच्या कोर्ससाठी आली होती. पुण्यात येऊन दोनच आठवडे झाले होते तोच तिने हे टोकाचं पाऊल उचललं. या प्रकरणीही पोलीस तपास सुरू आहे.