पुण्यात पावसाचा कहर, मुसळधार पावसामुळे पुणं पुन्हा पाण्यात

पुणे
रोहित गोळे
Updated Oct 22, 2019 | 09:58 IST

Pune Rain: पुण्यात काल (सोमवार) मध्यरात्री मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. काही सोसायट्यांमध्ये देखील पाणी घुसलं आहे.

torrential rains again in pune flood situation in many places
पुण्यात पावसाचा कहर, मुसळधार पावसामुळे पुणं पुन्हा पाण्यात  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • पुण्यात पुन्हा मुसळधार पाऊस, अनेक रस्ते पाण्याखाली
  • मुसळधार पावसामुळे पुणे पुन्हा पाण्याखाली
  • पुण्यात पावसचा प्रचंड जोर, सोसायट्यांमध्ये शिरलं पाणी

पुणे: ऑक्टोबर महिन्याचा शेवट जवळ आलेला असला तरीही पावसाचा परतीचा प्रवास अद्यापही सुरु झालेला नाही. कारण काल मध्यरात्री पुण्यात पुन्हा एकदा मुसळधार पाऊस झाला आहे. या मुसळधार पावसामुळे पुणे हे पुन्हा पाण्याखाली गेलं आहे. पुण्यातील लोहगाव, कात्रज आणि येरवडा या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं असल्याची प्राथमिक माहिती सध्या मिळते आहे. २६ सप्टेंबरला पुण्यात भयंकर पर्जन्यवृष्टी झाली होती. त्यात जवळजवळ २५ जणांचा मृत्यू झाला होता. या गोष्टीला महिनाही उलटत नाही तोच काल पुन्हा एकदा पावासाने हाहा:कार उडवून दिला. या सततच्या मुसळधार पावसामुळे पुणेकर मात्र सध्या खूपच त्रस्त झाले आहेत. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील लोहगाव येथे अनेक सोसायट्यांमध्ये प्रचंड प्रमाणात पाणी घुसलं आहे. त्यामुळे येथील अनेक वाहनं ही पाण्याखाली गेली आहेत. काल रात्रभर सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागात आज पहाटेच्या सुमारास पाणी साचू लागलं. साधारण चार फुटांपर्यंत रस्त्यांवर पाणी साचल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, काल दिवसभर पावसाने उसंत घेतली होती. पण रात्रीच्या सुमारास पावसाने पुन्हा जोर धरला. त्यामुळे पुण्यात पुन्हा एकदा पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली. 

पुण्याजवळ अनेक डोंगररांगा असल्याने येथे बऱ्याचदा मुसळधार पाऊस कोसळतो. त्यामुळे डोंगरांमधून वाहून येणारं पाणी हे थेट शहरी भागात घुसतं. पण पुण्यातील पूरपरिस्थितीला मोठ्या प्रमाणात झालेली अवैध बांधकामं देखील कारणीभूत आहेत. कारण अनेक ठिकाणी नदी पात्रात, ओढ्यांजवळ तर काही ठिकाणी नाल्यांवरच इमारती उभारण्यात आल्या आहेत. यामुळे पावसाचं पाणी थेट शहरात घुसून पूरस्थिती निर्माण होते. 

दरम्यान, कालच्या मुसळधार पावसामुळे लोहगाव परिसरात एक खासगी बस पाण्यात अडकली होती. मात्र अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने वेळीच बसमधील लोकांना बाहेर काढण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला. रात्रीपासून सुरु असलेल्या पावसामुळे पुणेकर देखील हतबल झाले आहेत. कारण संध्या पाऊस थांबला असला तरीही पुण्यात पाण्याचं प्रमाण वाढत असल्याचंच दिसतं आहे. कारण की, पुण्याजवळील इतर परिसरात अद्यापही पाऊस होत असल्याचं समजतं आहे. त्यामुळे अनेक इमारतींमधील पार्किंग परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं असून बऱ्याच गाड्या या पाण्याखाली गेल्या आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी