संतापजनक! साताऱ्यात अल्पवयीन मुलाचा लैंगिक छळ; त्यानंतर केले ब्लॅकमेल

पुणे
प्रशांत जाधव
Updated Oct 02, 2020 | 14:24 IST

अल्पवयीन मुलाचा लैंगिक छळ केल्याची घटना सातारा येथील कोरेगावमध्ये घडली आहे. तसेच आक्षेपार्ह फोटो पालकांना दाखवण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल केले. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

two man arrested for minor boy sexually assaulted
अल्पवयीन मुलाचे महिलेसोबत काढले फोटो, केले ब्लॅकमेल 

सातारा : कोरेगाव तालुक्यातील एका अल्पवयीन मुलाचा लैंगिक छळ करून त्याचे फोटो आई-वडिलांना दाखवण्याची धमकी देत हजारो रुपयांची खंडणी उकळणार्‍या दोन युवकांच्या मुसक्या कोरेगाव पोलिसांनी आवळल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, विक्रम उत्तम क्षत्रिय आणि शुभम तानाजी फाळके या दोघांनी सातारारोड येथील एका अल्पवयीन मुलाला हेरून जबरदस्तीने मोटरसायकलवर बसवून पाटखळ माथा येथील लॉजवर नेले. लॉजवरील एका रुममध्ये घेऊन गेल्यानंतर जबरदस्तीने मारहाण करून विवस्त्र केले. त्या रुममध्ये अगोदरच एक महिला होती. संबंधित महिला व त्या युवकांनी त्याचा लैंगिक छळ केला. त्यानंतर अल्पवयीन मुलाला घेऊन ते परत सातारारोडला आले. त्याच दिवशी दुपारी पुन्हा त्या अल्पवयीन मुलाला बरोबर घेऊन पाटखळ माथा येथील लॉजवर गेले. यावेळी विक्रम क्षत्रिय व शुभम फाळके यांनी सांगितले की, 'तुझे फोटो आमच्याकडे आहेत. ते तुझ्या आई-वडिलांना दाखवू,’ अशी धमकी देत ब्लॅकमेल केले. ‘तू आम्हाला १७ हजार रुपये ताबडतोब आणून दे.’ त्यांनी दिलेल्या धमकीच्या भीतीने घाबरलेल्या अल्पवयीन मुलाने घरातील कपाटात ठेवलेले १७ हजार रुपये शुभम फाळके याच्याकडे आणून दिले.


पुन्हा १७ सप्टेंबरला विक्रम क्षत्रिय याने शुभम फाळके याच्यामार्फत निरोप पाठवून मुलाला ब्लॅकमेल केले आणि पुन्हा १३ हजारांची मागणी केली. या वेळी त्या अल्पवयीन मुलाने घरातील कपाटातून १३ हजार रुपये काढून खंडणी मागणार्‍या विक्रम क्षत्रिय याला दिले. अखेर या त्रासाला कंटाळून मुलाने हा प्रकार वडिलांना सांगितला. त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या प्रकरणी दोघा आरोपींना अटक करण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास सातारारोड पोलीस दूरक्षेत्राचे एपीआय संतोष साळुंखे करत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी