इंदापूरच्या जागेवरून राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसमध्ये वादाची नवी ठिणगी, वडेट्टीवारांचं अजितदादांना थेट आव्हान

Vadettiwar's direct challenge to Ajit Pawar :राज्यात काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याची घोषणा मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. त्यामुळे आघाडीत बिघाडी होते काय अशी स्थिती निर्माण झाली आहे

Vadettiwar's direct challenge to Ajit Pawar
इंदापूरच्या जागेवरून राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसमध्ये नवा वाद   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • इंदापूर तालुक्याचा पुढील आमदार काँग्रेसचाच असेल
  • २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत तिकीट वाटपावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तणाव निर्माण झाला होता
  • आता भाजपात असणारे भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील हे भरणे यांचे कट्टर विरोधक मानले जातात

इंदापूर : इंदापूर विधानसभेची जागा काँग्रेस कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही, असा इशारा काँग्रेसच्या नेत्याने दिल्याने कॉंग्रेसने पुन्हा एकदा स्वबळाचा नारा दिला असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, त्याचबरोबर इंदापूरसहीत संपूर्ण राज्यात काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याची घोषणा मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. त्यामुळे आघाडीत बिघाडी होते काय अशी स्थिती निर्माण झाल्याच बोललं जाऊ लागल आहे. दरम्यान,  वडेट्टीवार यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना आव्हान दिलं आहे. त्यामुळे, येत्या २०२४च्या विधानसभा निवडणुकीत इंदापूरच्या जागेवरून काँग्रेस-राष्ट्रवादीत तणाव निर्माण होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

इंदापूर तालुक्याचा पुढील आमदार काँग्रेसचाच असेल

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काही दिवसांपूर्वीच स्वबळाचा नारा दिला होता. त्याचं हे विधान ताजं असतानाच इंदापूर विधानसभेची जागा काँग्रेस शंभर टक्के लढवणारच. ही जागा कुणालाही सोडण्यात येणार नाही, असं विधान विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे. त्यामुळे अजित पवार व राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे टेन्शन वाढले आहे. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले इंदापूरमध्ये आले होते. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधताना इंदापूर तालुक्याचा पुढील आमदार काँग्रेसचाच असेल असं म्हणत नव्या वादाला तोंड फोडले होते.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत तिकीट वाटपावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तणाव निर्माण झाला होता

पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील विधानसभेच्या जागेचा इतिहास संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसची की काँग्रेसची यावर अनेक वादंग निर्माण झाले होते. इंदापूरची जागा नेहमीच चर्चेचा विषय ठरली आहे. या जागेवरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची आघाडी निवडणुकीपूर्वीच तुटते की काय? असं चित्रं तेव्हा निर्माण झालं होतं. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत देखील तिकीट वाटपावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तणाव निर्माण झाला होता.

 

आता भाजपात असणारे भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील हे भरणे यांचे कट्टर विरोधक मानले जातात

हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेसमध्ये २० वर्षे राहून अनेक मंत्री पद भूषवली होती. ते काँग्रेसमध्ये असताना काँग्रेसच्या अनेक मोठ्या निर्णय प्रक्रियेत त्यांचा सहभाग असायचा. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाचाला कंटाळून काँग्रेस सोडत आहे, असा आरोप करत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. दरम्यान, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे अजित पवार यांचे कट्टर समर्थक समजले जातात. त्यांच्या विरोधात तत्कालीन कॉंग्रेसचे नेते आणि आता भाजपात असणारे भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील हे भरणे यांचे कट्टर विरोधक मानले जातात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी