Vasant More News | पुणे : राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदीवरील भोंगे हटवण्याचे वक्तव्य केल्यापासून राज्याच्या राजकारणात एक वेगळीच चर्चा रंगली आहे. अशातच राज यांच्या या वक्तव्याचा परिणाम त्यांच्या पक्षातीलच काही नेत्यांवर झाल्याचे दिसून आले. दरम्यान मनसेचे माजी पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांच्या भूमिकेविरोधात मत मांडले होते. पक्षाच्या विरोधात घेतलेल्या भूमिकेमुळे गुरूवारी वसंत मोरे यांना पुण्याच्या शहरअध्यक्षपदावरून हटवण्यात आले. (Vasant More's Facebook post goes viral after being removed from the post of pune mns chief).
त्यानंतर पुण्याच्या शहराध्यक्षपदी नगरसेवक साईनाथ बाबर यांची वर्णी लागली. मात्र आता वसंत मोरे यांनी आज फेसबुक पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी फिलिंग इमोशनल म्हणत 'मी आजच साहेबांच्या हस्ते उद्घाटन केलेल्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर उद्यानात असे रंग भरले होते आणि आजच...' अशा आशयाची फेसबुक पोस्ट वसंत मोरे यांनी केली आहे.
अधिक वाचा : सुप्रिया सुळे यांच्यासोबत अशा अंदाजात बोलताना दिसले शशी थरूर
दरम्यान, वसंत मोरे यांच्या या फेसबुक पोस्टमुळे आता मनसेमध्ये चर्चांना उधान आले आहे. कारण मनसे पुणे शहराध्यक्षपदावरून हटवल्यानंतर साईनाथ बाबर यांच्या नावावर एकमत झाले. त्यानंतर काही तासातच वसंत मोरे यांनी फेसबुक पोस्ट केली आहे. लक्षणीय बाब म्हणजे पुणे महानगरपालिकेत मनसेचे दोनच नगरसेवक आहेत. त्यामुळे आता शहराध्यक्षपद बदलल्यामुळे आगामी पुणे महानगरपालिकेत मनसेला किती यश मिळते हे पाहण्याजोगे असेल.
राज्याच्या राजकारणात आता मनसे चर्चेचा विषय बनली आहे, पुणे महानगरपालिकेत सध्या मनसेचे वसंत मोरे आणि साईनाथ बाबर हे दोनच नगरसेवक आहेत. वसंत मोरेंना दूर केल्यानंतर शहराध्यक्षपदाची जबाबदारी आता साईनाथ बाबर यांच्याकडे सोपवली आहे. मोरे आणि बाबर ज्या कात्रज आणि कोंढव्यामध्ये नगरसेवक आहेत. या दोन्ही प्रभागातील मुस्लिम मतदारांची संख्या जास्त आहे. मोरे यांचा जो प्रभाग येतो त्यामध्येही मुस्लिम मतं जास्त असल्यामुळे मशिदीवरच्या राज ठाकरे यांच्या वक्तव्यामुळे वसंत मोरे यांनी नाराजी व्यक्त करुन त्याला विरोध केला होता. तसेच त्यांनी राज ठाकरेंच्या भूमिकेला विरोध करत हनुमान चालीसा लावायला विरोध दर्शवला होता. असे केल्यास याचा मुस्लिम मतदारांमध्ये नाराजीचा सूर पसरेल त्यामुळे मोरे यांनी विरोध दर्शवला होता. अशातच आता त्यांची फेसबुक पोस्ट चर्चेचा विषय बनली आहे.
अधिक वाचा : आता शेतकऱ्यांच्या उत्पन्नावरही Income Tax ची नजर
राज ठाकरे यांनी ज्या वेळेस मशिदीवरील भोंग्याविरोधात वक्तव्य केले तो दिवस म्हणजे पाडव्याचा दिवस. २ वर्षाच्या कालावधीनंतर राज ठाकरे यांनी शिवतीर्थावर पाडव्या मेळाव्यात आपल्या हिंदुत्वाचा मार्ग जाहीर केला. राज यांच्या या भाषणानंतर तत्कालीन पुणे मनसेचे शहर अध्यक्ष वसंत मोरे हे तेव्हापासूनच आपली भूमिका मांडत आले आहेत. पाडव्याच्या दुसऱ्या दिवशीपासून पुण्यातील मनसेचे वातावरण अधिकच चिघळले होते. त्यामुळे वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांच्या भोंग्याविरुद्धचा आदेश नाकारल्यानंतर त्यांना पुणे शहराध्यक्षपदावरुन हटवले गेले.
मनसेच्या मशिदीवरील भूमिकेनंतर राज्याचे राजकारण एका वेगळ्या दिशेने जात असल्याचे पाहायला मिळत आहे. काही पक्षांनी वसंत मोरे यांना आपल्या पक्षात येण्याची खुली ऑफर दिली. पूर्वी मनसेत असलेल्या रुपाली पाटील यांनीही वसंत मोरे यांना राष्ट्रवादीत येण्याचे आमंत्रण दिले आहे. त्यांच्या या फेसबूक पोस्टला त्यांच्या समर्थकांनी उत्तर दिले आहे. भावी आमदार असल्याच्या विविध प्रतिक्रिया देण्यात आल्या आहेत. तसेच राष्ट्रवादीचे विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी देखील एक सच्चा कार्यकर्ता आमच्या पक्षात आला तर त्यांचे स्वागतच असेल असे म्हटले.