चंद्रकांत पाटील यांच्या बाईक रॅलीत, नियमांची ऐशीतैशी, पोलीस करणार कारवाई 

पुणे
Updated Oct 10, 2019 | 19:32 IST | टाइम्स नाऊ मराठी

आगामी विधानसभेसाठी पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदार संघातील अधिकृत उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्या बाईक रॅलीत वाहतूक नियमांची ऐशीतैशी करण्यात आली.

vidhansabha election 2019 chandrakant patil bike rally break traffic role news in marathi google batmya
चंद्रकांत पाटील याच्या बाईक रॅलीत, नियमांची ऐशीतैशी, पोलीस करणार कारवाई   |  फोटो सौजन्य: Twitter

पुणे :  आगामी विधानसभेसाठी पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदार संघातील अधिकृत उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्या बाईक रॅलीत वाहतूक नियमांची ऐशीतैशी करण्यात आली. आज जर देशातील वाहतूक नियम चंद्रकांत पाटील यांच्या बाईक रॅलीत लावले असते तर पुणे पोलिसांच्या महसुलात कोट्यवधीची रुपयांची भर पडली असती.  चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली कोथरूड मतदारसंघात भव्य बाईक रॅली काढण्यात आली. या रॅली सुमारे १०० हून अधिक बाईकस्वार विना हेल्मेट बाईक चालवत होते. वाहतूक नियम तोडल्याप्रकरणी या संबंधित बाईकस्वारांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती पुण्याच्या वाहतूक पोलिस उपायुक्तांनी दिली आहे. पुण्याचे वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार या बाईक रॅलीचे सीसीटीव्ही फूटेज चेक करण्यात येईल आणि संबंधीत बाईकस्वारांवर कारवाई करण्यात येईल. 

विधानसभेच्या मतदानाला आता केवळ ११ दिवस शिल्लक असताना राज्यभरात प्रचाराचा धुराळा उडत आहे. या प्रचारात अनेकजण शक्तीप्रदर्शन करीत आहेत. असेच शक्तीप्रदर्शन कोथरूड विधानसभेतील भाजपचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी बाईक रॅलीच्या माध्यमातून करण्याचे ठरविले. आज सकाळी मोठी बाईक रॅली काढण्यात आली. पण या बाईक रॅलीतील नियमांच्या पायमल्लीमुळे चंद्रकांत दादा पुन्हा चर्चेत आले आहेत. या बाईक रॅलीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि चंद्रकांत दादावर नेटीझन्सने टीकेची झोड उठवली.  या विना हेल्मेट बाईकस्वारांवर कारवाई होणार का असा प्रश्न यावेळी विचारण्यात आला. 

पुणे शहरात १ जानेवारी २०१९ पासून विनाहेल्मेट बाईकस्वारांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईविरोधात विविध संघटनेकडून आंदोलन करण्यात येऊन निषेध देखील करण्यात आला होता. शहराच्या एका भागात कारवाई होत आहे. तर दुसऱ्या भागात भाजपचे मंत्र्यांची बाईक रॅली असल्यामुळे कारवाई होत नाही याबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे. 

या नियमांची पायमल्ली करणाऱ्या बाईक रॅलीबाबत पुण्याचे वाहतूक पोलीस उपायुक्तांशी माध्यमांनी संपर्क साधल्यावर त्यांनी सांगितले की, कोथरूड भागात जे कोणी बाईकस्वार विना हेल्मेट रॅलीत सामील झाले असतील त्यांची सीसीटीव्हीतून पाहणी करण्यात येईल आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी