पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी एका दिग्गज नेत्याच्या मुलाच्या शाही विवाह सोहळ्याला जाण्याचे टाळले आहे. अजित पवार यांनी आपल्यावर पुन्हा टीका व्हायला नको म्हणून शाही विवाह सोहळ्याला उपस्थिती दर्शवली नसल्याचे बोलले जात आहे. दम्यान सदर शाही विवाह सोहळा हा भाजप नेते आणि माजी खासदार धनंजय महाडिक (dhananjay mahadik) यांच्या मुलाचा होता. आता दिग्गज नेत्याच्या मुलाचा विवाह सोहळा म्हणजे मोठमोठे नेते तर हजेरी लावणारच. आणि तसं झालही. महाडिकांच्या मुलाच्या शाही विवाह सोहळ्यात सर्वपक्षीय दिग्गज राजकीय नेते उपस्थित होते. मात्र राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना या नेत्यांच्या समोरच सोशल डिस्टन्सिंगचा संपूर्ण फज्जा उडाल्याचं पाहायला मिळालं.
पुण्यात पार पडलेल्या या विवाह सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार, (sharad pawar) भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले, भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी उपस्थित दर्शवली होती. मात्र यातील काही नेत्यांनीच मास्क घालणं टाळलं असल्याचे पाहायला मिळाले. तसंच या नेत्यांसमोरच सोशल डिस्टन्सिंगचा देखील पुरता फज्जा उडाला होता. त्यामुळे नियम घालून देणारेच नियमांच उल्लंघन करत असतील तर सर्वसामान्य जनतेकडून काय अपेक्षा करणार, असा सवाल आता उपस्थित होत आहे.
विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी नाशिकमधील राष्ट्रवादी आमदाराच्या शाही विवाहातील गर्दीवरून सरकारवर टीका केली होती. मात्र, आता इकडे पुण्यातही भाजपच्या माजी खासदाराच्या मुलाच्या लग्नात नेमकं तेच चित्र बघायला मिळालं असल्याने प्रवीण दरेकर यावर काय बोलतील का? याकडे सर्वांचे लक्ष आहे. दरम्यान आपल्यावर टीका नको म्हणून अजित पवारांनी हा विवाह सोहळा टाळले असल्याची माहिती आहे. लॉकडाऊनचा निर्णय घेतल्यानंतर अजित पवारांनी पीडीसीसी बँकेची सर्वसाधारण सभाही अजित पवार यांनी टाळली. आपणच कोरोना सोशल डिस्टन्सचे निर्बंध लादणार आणि पुन्हा आपणच नियम तोडायला नको म्हणून अजित पवारांनी हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, राज्यात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला असून, काही ठिकाणी तर लॉकडाऊन करण्यात आले आहे. पुण्यामध्ये विवाह सोहळ्यासाठी फक्त २०० लोकांना परवानगी दिली जाईल, असं नुकतंच प्रशासनाकडून सांगण्यात आलं होतं. मात्र धनंयज महाडिक यांच्या मुलाच्या लग्न सोहळ्याला मात्र ७०० ते ८०० लोकं उपस्थित असल्याचा अंदाज लावण्यात येत आहे. त्यामुळे नियम फक्त सर्वसामान्य जनतेलाच का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.