महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणार्या महाबळेश्वरचा पारा घसरला आहे. गेल्या दोन दिवसांपासून महाबळेश्वरमध्ये थंडीचा जोर वाढत चालला असून प्रसिद्ध वेण्णा तलाव परिसरात तर थंडी अधिकच जाणवत आहे. आज सकाळी पहाटे सहा वाजता वेण्णा लेकवर पारा घसरून सहा अंशावर आला आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांसह पर्यटक दिवसभर उबदार गरम कपडे,शाली, स्वेटर्स घालून फिरताना दिसत आहेत. अनेक ठिकाणी शेकोट्या पेटवून त्याभोवती नागरिक शेकत बसल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. प्रसिद्ध वेण्णा लेकवर जणू धुक्याची चादरच पसरल्याचे दृश्य सध्या पाहायला मिळत आहे. सकाळी वेण्णा तलावावर गेलेले नागरिक मनमुरादपणे याचा आनंद लुटत होते. त्यामुळे महाबळेश्वरमधील थंडी अनुभवण्यासाठी जाऊ इच्छिणाऱ्या पर्यटकांसाठी आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.