पैशांसाठी स्फोटाने फोडले एटीएम मशिन

पुणे
रोहन जुवेकर
Updated Jul 21, 2021 | 16:42 IST

पुण्याजवळ चाकण एमआयडीसी परिसरातील भांबोली येथे मुख्य रस्त्याच्या शेजारी हिताची कंपनीचे एटीएम मशिन आहे. चोरट्यांनी मशिनचा पत्रा वाकवण्यासाठी या एटीएम मशिनजवळ स्फोट केला.

blast in atm machine near pune
पैशांसाठी स्फोटाने फोडले एटीएम मशिन 

थोडं पण कामाचं

  • पैशांसाठी स्फोटाने फोडले एटीएम मशिन
  • पुण्याजवळ घडली घटना
  • पोलीस तपास सुरू

पुणे: एटीएम मशिनचे लॉक तोडणे किंवा मशिनचा पत्रा कापून आतील पैसे चोरणे कठीण असते. यामुळेच चोरट्यांनी एटीएम मशिनजवळ स्फोट करुन मशिनचा पत्रा वाकवण्याचे उद्योग सुरू केले आहेत. पुण्याजवळ चाकण एमआयडीसी परिसरातील भांबोली येथे मुख्य रस्त्याच्या शेजारी हिताची कंपनीचे एटीएम मशिन आहे. चोरट्यांनी मशिनचा पत्रा वाकवण्यासाठी या एटीएम मशिनजवळ स्फोट केला. स्फोटाचा मोठा आवाज झाला आणि एटीएमचे भरपूर नुकसान झाले. स्फोट केल्यानंतर चोरट्यांनी एटीएममधील पैसे चोरुन पळ काढला. blast in atm machine near pune

चोरट्यांच्या उद्योगाची माहिती मिळताच महाळुंगे पोलीस ठाण्याचे पथक, गुन्हे शाखेचे पथक (Crime Branch) आणि श्वान पथक (Dog Squad) घटनास्थळी पोहोचले. हिताची कंपनीच्या एटीएममधून नेमकी किती रक्कम चोरीला गेली याची माहिती पोलिसांनी जाहीर केलेली नाही. एटीएम मशिनजवळ करण्यात आलेल्या स्फोटाची पोलीस चौकशी सुरू आहे. कोणती स्फोटके वापरुन स्फोट करण्यात आला याचाही तपास सुरू आहे. पोलिसांनी परिसरात किती सीसीटीव्ही कॅमेरे आहेत यांचा आढावा घेऊन त्या सर्व कॅमेऱ्यांचे फूटेज तपासण्याचा निर्णय घेतला आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फूटेजमधून चोरट्यांविषयी जास्तीत जास्त माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मशिन ज्या ठिकाणी आहे त्या परिसरात चौकशी सुरू आहे.

पुण्याजवळ स्फोटाद्वारे एटीएमवर डल्ला मारण्यात आला तर उत्तर प्रदेशमध्ये ग्रेटर नोएडात चोरट्यांनी विशेष अवजार वापरुन एटीएमचा पत्रा कापला. ग्रेटर नोएडात तीन चोरट्यांनी पंजाब नॅशनल बँकेच्या एटीएमचा पत्रा विशिष्ट अवजार वापरुन कापला आणि मशिनमधून सुमारे १७ लाखांची रोख रक्कम चोरली. पोलिसांनी चोरी करणाऱ्या तिघांना अटक केली. चोरट्यांकडून पोलिसांनी देशी पिस्तुल आणि अडीच लाख रुपये जप्त केले. उर्वरित रकमेच्या जप्तीसाठी पोलीस चोरट्यांची कसून चौकशी करत आहेत. आरोपींची नावं इमरान, नासिर आणि शाहीद असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी