Pune : श्री क्षेत्र थापलिंग खंडोबा देवाच्या यात्रेला लाखो भाविकांची गर्दी; बैलगाडा घाटातला थरार ठरतोय आकर्षण

पुणे
Updated Jan 08, 2023 | 15:04 IST

पौष पौर्णिमेच्या निमित्तानं पुण्याच्या पारगावात श्री क्षेत्र थापलिंग खंडोबा देवाची यात्रा भरली आहे. लाख - दोन लाख लोक येण्याचा अंदाज आहे.

थोडं पण कामाचं
  • पुण्याच्या पारगावात श्री क्षेत्र थापलिंग खंडोबा देवाची यात्रा
  • लाख - दोन लाख भाविक येणार
  • बैलगाडा घाटातला थरार वेधक

Pune: पौष पौर्णिमेच्या निमित्तानं नागापुरच्या पारगावात श्री क्षेत्र थापलिंग खंडोबा देवाची यात्रा (Shree Kshetra Thapaling Khandoba Devachi Yatra) भरली आहे. 'सदानंदाचा यळकोट करत' खंडोबाच्या दर्शनासाठी आजुबाजूच्या परिसरासह पुणे आणि अहमगनगर जिल्ह्यातून शुक्रवारी (6 जानेवारीला) लाखो भाविक आले होते. (Pune Shree Kshetra Thapaling Khandoba Devachi Yatra Jan 2023)

ग्रामीण जनतेच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला तो म्हणजे बैलगाडा घाटातला थरार. दोन दिवस चालणाऱ्या या यात्रेत 450 हुन अधिक बैलगाडे धावले. कोणत्याही इनामाशिवाय पळविल्या जाणाऱ्या या बैलगाड्यांना नवसाचे गाडे म्हटले जाते. तसेच यात्रेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथे भरणारा शेती उपयोगी अवजारांचा बाजार. यात्रेत येणाऱ्या दर्शनार्थींमध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांचे प्रमाण जास्त असते. त्याच्यांसाठी इथे अवजारांचा बाजार मांडला जातो. खंडोबा देवाच्या या नागापूरातील टेकडीवर दोन दिवस अख्ख गावचं वसलेलं असतं. शहरी भागातल्या मॉलमध्ये ज्या पद्धतीने शॉपिंग केली जाते, त्याचप्रकारे या माळरानावर उभारलेल्या जुन्या पद्धतीच्या मॉलमध्ये इथले नागरिक खरेदी करतात. 

कोरोनाच्या संकटामुळे गेली दोन वर्षे खंडोबाची यात्रा झाली नव्हती. त्यामुळे यंदा मोठ्या प्रमाणात भाविकांनी या यात्रेला गर्दी केली. भाविकांना यात्रेच्या ठिकाणी जाण्यासाठी  नारायणगाव, राजगुरुनगर या आगारांमधून जादा एसटी बसेस सोडण्यात आल्या होत्या. 2020 नंतर आता ही यात्रा भरत असल्यामुळे लाखो भाविक आले होते. त्यामुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहु थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली 30 पोलीस कर्मचारी गडावर तैनात करण्यात आले होते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी