8 Features of Anganwadi Bharadi Devi Jatra : आंगणेवाडी : महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यात आंगणेवाडी हे गाव आहे. या गावात दरवर्षी भराडी नावाच्या देवीची जत्रा असते. यंदा ही जत्रा गुरुवार २४ फेब्रुवारी २०२२ रोजी आहे. आंगणेवाडीच्या जत्रेच्या निमित्ताने दोन दिवसांसाठी तळकोकणातील बहुसंख्य नागरिक गावी येतात. अनेक विवाहीत महिला देवीच्या दर्शनासाठी माहेरी येतात.
दरवर्षी किमान सहा ते सात लाख भाविक आंगणेवाडीच्या जत्रेला हजेरी लावतात. यात मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातून आंगणेवाडीला जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मुंबईतील गिरगाव आणि गिरणगाव (लालबाग-परळ) येथून मोठ्या संख्येने नागरिक आंगणेवाडीच्या जत्रेला जातात.
एस टी महामंडळाला आंगणेवाडीसाठी विशेष गाड्यांच्या व्यवस्थेमुळे किमान २०-३० लाखांचे उत्पन्न होते. अनेक खासगी टूर्स आणि ट्रॅव्हल्स कंपन्यांना पण आंगणेवाडीच्या जत्रेच्या निमित्ताने फायदा होतो.
राजकारण आणि समाजकारण करणारे लोकप्रतिनिधी तसेच राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आंगणेवाडीच्या जत्रेला हमखास हजेरी लावतात. इतर नागरिकही येतात. यामुळे स्थानिकांना फुले, नारळ, प्रसाद, पूजेची थाळी, देवीचे फोटो अशा अनेक वस्तूंच्या विक्रीतून उत्तम उत्पन्न होते. यात्रेच्या काळात आंगणेवाडी आणि आसपासच्या गावांमध्ये दोन दिवस लोकांचा मोठा राबता असतो. आसपासची सर्व लहान-मोठी हॉटेल, लॉज भरलेले असतात. लाखो नागरिकांच्या खाण्यापिण्याच्या व्यवस्थेतून स्थानिकांना चांगले उत्पन्न मिळते.