सिंधुदुर्ग: संतोष परब (Santosh Parab) हल्ला प्रकरणात अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर भाजप आमदार (BJP MLA) नितेश राणेंना (Nitesh Rane) जामीन (Bail) मंजूर झाला. सत्र न्यायालयापासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत धाव घेतलेल्या नितेश राणेंना काल जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन दिला. विशेष बाब म्हणजे जामीन मिळताच नितेश राणेंच्या प्रकृतीत सुधारणा होऊ लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून नितेश राणे यांच्या छातीत दुखत होते. त्यामुळे चांगल्या ह्रदयरोग तज्ज्ञांकडून उपचार करवून घेण्यासाठी नितेश राणे यांना ओरोस जिल्हा रुग्णालयातून (district hospital) कोल्हापूरच्या (Kolhapur) सीपीआर (CPR) रुग्णालयात (hospital) हलवण्यात आले होते. कालपर्यंत नितेश राणे यांना छातीच्या दुखण्यासोबत उलट्यांचा आणि स्पॉन्डिलाइटिसचा प्रचंड त्रास जाणवत होता. मात्र, सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने (Sindhudurg Sessions Court) जामीन मंजूर केल्यानंतर नितेश राणे यांना आज लगेचच रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार आहे.
काही वेळात नितेश राणे सीपीआर रुग्णालयातून सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना होतील. सिंधुदुर्गात आल्यानंतर नितेश राणे यांची ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी होईल. त्यानंतर नितेश राणे जामिनाचे कायदेशीर सोपस्कार पूर्ण करण्यासाठी सावंतवाडी कारागृहात जातील. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे नितेश राणे यांची जामिनावर सुटका होईल. त्यामुळे नितेश राणे आजच आपल्या घरी परतण्याची शक्यता आहे.
आमदार नितेश राणे आणि त्यांचे खासगी सचिव राकेश परब यांना प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.व्ही. हांडे यांच्या न्यायालयाने बुधवारी जामीन मंजूर केला होता. हा सशर्त जामीन आहे. त्यानुसार नितेश राणे आणि त्यांचे खासगी सचिव राकेश परब यांना पोलिसांकडून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल होईपर्यंत कणकवली तालुक्यामध्ये प्रवेश बंदी करण्यात आली आहे. तसेच या दोघांनाही ओरोस पोलीस ठाण्यात आठवड्यातून एकदा हजेरी लावावी लागणार आहे. शिवाय तपास कामात पोलिसांना गरज भासल्यास सहकार्य करावे, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
नितेश राणे यांना जामीन मिळणे, हा राणे कुटुंबीयांसाठी मोठा दिलासा मानला जात आहे. त्यामुळेच नितेश राणे (Nitesh Rane) यांना जामीन मिळताच न्यायालयाबाहेर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना निलेश राणे यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. प्रसारमाध्यमांसमोर बोलताना त्यांचा चेहराही चांगलाच खुलला होता. आजचा दिवस हा आमच्यासाठी आनंदाचा आहे. सगळ्याच गोष्टी आज बोलणार नाही, असे निलेश राणे यांनी म्हटले होते.
नितेश राणे यांच्याबाबत सगळ्याच गोष्टी आज बोलून उपयोग नाही. त्या बाहेर काढायच्या असतील तेव्हा काढू. न्यायालयाच्या प्रक्रियेनुसार आज नितेश राणे यांना जामीन मिळाला. त्याचा आम्हाला आनंद आहे. सत्य परेशान हो सकता है, लेकिन पराजित नही, ही म्हण यानिमित्ताने पुन्हा सिद्ध झाली, असे निलेश राणे यांनी म्हटले होते.