अमित शहांचा रविवारी सिंधुदुर्ग दौरा

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रविवारी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

Amit Shah to inaugurate BJP MP Narayan Rane’s medical college and hospital on Feb 7
अमित शहांचा रविवारी सिंधुदुर्ग दौरा 
थोडं पण कामाचं
  • अमित शहांचा रविवारी सिंधुदुर्ग दौरा
  • नारायण राणेंच्या मेडिकल कॉलेजचे उद्घाटन करणार
  • महाराष्ट्रातील भाजपचे सर्व प्रमुख नेते रविवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात

मालवण: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या (रविवार, ७ फेब्रुवारी २०२१) महाराष्ट्रात सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. भाजप खासदार आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या मेडिकल कॉलेजचे उद्घाटन करण्याच्या निमित्ताने अमित शहा सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्याचा दौरा करत आहेत. अमित शहांचा दौरा असल्यामुळे महाराष्ट्रातील भाजपचे सर्व प्रमुख नेते रविवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात उपस्थित असतील. (Amit Shah to inaugurate BJP MP Narayan Rane’s medical college and hospital on Feb 7)

विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार नारायण राणे यांच्यासह भाजपचे प्रमुख नेते उद्घाटनप्रसंगी उपस्थित असतील. या निमित्ताने कोण कोणत्या विषयावर काय बोलणार याकडे अनेकांचे लक्ष आहे.

शिवसेनेचा सर्वाधिक मतदारवर्ग महामुंबई (Mumbai Metropolitan Area / मुंबई महानगर क्षेत्र) आणि कोकण या पट्ट्यात आहे. अमित शहांच्या सिंधुदुर्ग दौऱ्याचे निमित्त करुन भाजप शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे.

कोकणातील रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांच्या काही भागांना निसर्ग चक्रीवादळाचा मोठा तडाखा बसला. या धक्क्यातून सावरण्यासाठी पुरेशी मदत मिळाली नसल्यामुळे स्थानिकांमध्ये ठाकरे सरकारविषयी नाराजी असल्याची चर्चा आहे. या नाराजीचा पुढील काही दिवसांत भाजप राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न करण्याचीही शक्यता आहे.

आधी अमित शहा शनिवारी ६ फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा करणार होते. मात्र शेतकऱ्यांच्या चक्का जाम आंदोलनाची घोषणा झाल्यामुळे अमित शहांचा दौरा एक दिवसासाठी पुढे ढकलण्यात आला आहे. आता ते रविवारी ७ फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. 

पश्चिम बंगालच्या निवडणुकीनंतर भाजपचे केंद्रीय नेतृत्व महाराष्ट्राच्या राजकारणावर लक्ष केंद्रीत करेल, अशी चर्चा होती. मात्र अमित शहा यांचा सिंधुदुर्ग दौरा जाहीर झाल्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आले आहे. 

मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात शिवसेनेचे अरविंद सावंत केंद्रीय अवजड उद्योगमंत्री झाले. पण महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षासोबत जाण्याचा निर्णय घेतला. यानंतर अरविंद सावंत यांना केंद्रातल्या मंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा आदेश शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांच्याकडून देण्यात आला. सावंत यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या या पदाचा कारभार सध्या केंद्रीय पर्यावरणमंत्री तसेच माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे आहे. लवकरच नारायण राणे यांना केंद्रीय अवजड उद्योगमंत्री केले जाण्याची शक्यता आहे. 

नारायण राणे यांचा तळकोकणात मोठा प्रभाव आहे. काही प्रमाणात रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातही त्यांची पकड आहे. राणेंना मंत्रीपद देऊन त्यांच्या कोकणातील सामर्थ्याचा पक्षवाढीसाठी जास्तीत जास्त वापर करुन घेण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. भाजपची ताकद वाढल्यास कोकणात शिवसेनेपुढे मोठे आव्हान निर्माण होऊ शकते. या सगळ्याची सुरुवात करण्याच्या दृष्टीने अमित शहा कोकण दौऱ्यात काय बोलतात याबाबत तर्कवितर्क सुरू आहेत.

अलिकडेच ग्रामपंचायतीची निवडणूक पार पडली. या निवडणुकीच्या निमित्ताने कोकणातील राजकारणावरची पकड मजबूत असल्याचे राणेंनी दाखवून दिले. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७० पैकी ४५, रत्नागिरी जिल्ह्यात ४७९ पैकी ५९ आणि रायगड जिल्ह्यात ८८ पैकी ३३ ठिकाणी भाजपचा झेंडा फडकला. ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत मोठे यश मिळाल्यानंतर भाजपने निलेश राणे यांना महाराष्ट्र प्रदेश सचिव केले. आता राणेंच्या मेडिकल कॉलेजच्या उद्घाटनप्रसंगी अमित शहा महत्त्वाची घोषणा करण्याची किंवा महत्त्वाचे संकेत देण्याची शक्यता आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्याच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या राजकारणात काही नव्या घडामोडींचीही शक्यता व्यक्त होत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी