प्रसिद्ध आंगणेवाडी यात्रा रद्द

anganewadi yatra cancelled कोरोना संकटामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण आंगणेवाडी येथील श्री भराडीदेवी यात्रा रद्द केल्याचे जाहीर करण्यात आले.

anganewadi yatra cancelled
प्रसिद्ध आंगणेवाडी यात्रा रद्द 
थोडं पण कामाचं
  • प्रसिद्ध आंगणेवाडी यात्रा रद्द
  • एस टी महामंडळ यात्रेसाठी विशेष बसची व्यवस्था करणार नाही
  • आंगणेवाडी यात्रा नसल्यामुळे स्थानिकांचे आर्थिक नुकसान

मुंबई: कोरोना संकटामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण आंगणेवाडी येथील श्री भराडीदेवी यात्रा रद्द केल्याचे जाहीर करण्यात आले. आंगणेवाडीची यात्रा २०२१ या वर्षात होणार नाही, असे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. यात्रेच्या निमित्ताने दोन दिवसांसाठी तळकोकणातील बहुसंख्य नागरिक गावी येतात. अनेक विवाहीत महिला देवीच्या दर्शनासाठी माहेरी येतात. पण यंदा यात्रा होणार नसल्यामुळे नागरिकांनी आवश्यकता नसल्यास प्रवास टाळावा आणि कोविड प्रोटोकॉलचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले. (anganewadi yatra cancelled)

कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत आंगणेवाडीवासीयांनी यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचे पालकमंत्री उदय सामंत म्हणाले. आंगणेवाडी यात्रा रद्द झाल्याची घोषणा पालकमंत्र्यांनी केली त्यावेळी आंगणेवाडी विकास मंडळाचे अध्यक्ष भास्कर आंगणे पत्रकार परिषदेला उपस्थित होते. 

दरवर्षी किमान सहा ते सात लाख भाविक आंगणेवाडीच्या यात्रेला हजेरी लावतात. यात मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातून आंगणेवाडीला जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मुंबईतील गिरगाव आणि गिरणगाव या दोन्ही पट्ट्यातून मोठ्या संख्येने नागरिक आंगणेवाडीच्या यात्रेला जातात. 

यंदा ६ मार्च रोजी आंगणेवाडीची यात्रा आहे. मात्र कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून आंगणेवाडीची यात्रा रद्द करण्यात आली आहे. आंगणेवाडीतील नागरिक कोविड प्रोटोकॉलचे पालन करत आहेत. नागरिकांनी मागील वर्षभरात सर्व सण घरातच साजरे केले. मोठा उत्सव करणे टाळले. आंगणेवाडीतील हा आदर्श कायम कोरोना प्रसाराचे संकट टाळण्यासाठी ६ मार्च रोजी असलेली आंगणेवाडीची यात्रा रद्द करण्याचा निर्णय परस्पर सहमतीने घेतला आहे. 

गावाबाहेर राहणाऱ्यांना यंदा आंगणेवाडीच्या यात्रेला उपस्थिती लावण्यास मनाई करण्यात आली आहे. आंगणेवाडी येथे राहणारे ग्रामस्थ श्री भराडीदेवी हिची परंपरागत पद्धतीने पूजा करतील. इतर भाविकांनी घरुनच भराडीदेवीला नमस्कार करावा, असे आवाहन पालकमंत्री उदय सामंत आणि आंगणेवाडी विकास मंडळाचे अध्यक्ष भास्कर आंगणे यांनी केले. 

मागच्या वर्षी एस टी महामंडळाने आंगणेवाडीच्या यात्रेसाठी विशेष गाड्यांची व्यवस्था करुन २५ ते २७ लाख रुपयांचे उत्पन्न कमावले होते. पण यंदा गावाबाहेर राहणाऱ्यांसाठी आंगणेवाडी यात्रा नसल्यामुळे एस टी महामंडळ यात्रेसाठी विशेष बसची व्यवस्था करणार नाही, असे समजते. 

राजकारण आणि समाजकारण करणारे अनेकजण राजकीय पक्षात पदाधिकारी, नगरसेवक, आमदार, खासदार, महापौर, उद्योजक म्हणून सक्रीय आहेत. ही मंडळी आंगणेवाडीच्या यात्रेला हमखास येतात. शिवाय इतर नागरिकही यात्रेला येतात. यामुळे स्थानिकांना फुले, नारळ, प्रसाद, पूजेची थाळी, देवीचे फोटो अशा अनेक वस्तूंच्या विक्रीतून उत्तम उत्पन्न होते. यात्रेच्या काळात आंगणेवाडी आणि आसपासच्या गावांमध्ये दोन दिवस लोकांचा मोठा राबता असतो. आसपासची सर्व लहान-मोठी हॉटेल, लॉज भरलेले असतात. लाखो नागरिकांच्या खाण्यापिण्याच्या व्यवस्थेतून स्थानिकांना चांगले उत्पन्न मिळते. मात्र यंदा गावाबाहेर राहणाऱ्यांसाठी आंगणेवाडी यात्रा नसल्यामुळे स्थानिकांची उत्पन्नाची मोठी संधी बुडणार आहे. 

कोरोना संकटामुळे आधीच दीर्घकाळ मंदिर बंद होते. नागरिक कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून धार्मिकस्थळांना भेट देणे टाळत होते. यामुळे नऊ-दहा महिने स्थानिकांना भाविकांच्या माध्यमातून होणारे उत्पन्न थांबले होते. आता गावाबाहेर राहणाऱ्यांसाठी आंगणेवाडी यात्रा नसल्यामुळे बाहेरून येणाऱ्यांच्या माध्यमातून होणारे उत्पन्न बुडणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी