Nitesh Rane : सिंधुदुर्ग : जर आमच्या विचारांचा सरपंच निवडून दिला नाही तर आम्ही एक रुपयांचाही विकास निधी देणार नाही अशी उघड धमकी भाजप आमदार नितेश राणे यांनी दिली आहे. तसेच आपण सत्ताधारी पक्षाचे आमदार आहोत, त्यामुळे पालकमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्रीही आपल्याला विचारल्याशिवाय निधी मंजूर करत नाही असेही राणे म्हणाले. (bjp mla nitesh rane threaten voter over election and development fund)
सिंधुदुर्गमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नितेश राणे मतदारांशी संवाद साधत होते. तेव्हा राणे म्हणाले की आम्ही नारायण राणे यांच्या तालमीत तयार झालो आहोत, त्यामुळे आमच्या पोटात एक आणि ओठात एक असे नसते. जर आमच्या विचारांचा सरपंच निवडून दिला नाही तर आम्ही विकास निधी देणार नाही, याला हवं तर धमकी समजा किंवा काही समजा. मी भाजपचा म्हणजेच सत्ताधारी पक्षाचा आमदार आहे. त्यामुळे जेव्हा पालकमंत्री असो, उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस असो किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असो. आम्हाला विचारल्याशिवाय ते निधी मंजूर करत नाही. त्यामुळे आमच्या विचारसरणीचा सरपंच तुम्ही निवडून दिला नाही तर आम्ही विकासनिधी देणार नाही अशी धमकी राणे यांनी दिली आहे. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यांच्यावर चौफेर टीका होत आहे.