Tourism Ministry: सिंधुदुर्ग: शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी आपल्याला मिळालेल्या खात्याचा कोकणाला (Kokan) फारसा उपयोग नसल्याचे वक्तव्य करून काल नाराजी व्यक्त केली होती. मात्र आज त्यांनी याबाबत सारवासारव करत आपल्याला मिळालेल्या खात्याबाबत नाराजी नसल्याचे सांगितले. मात्र त्याच वेळी आपल्यापेक्षा पर्यटनाचा (Tourism) अभ्यास महाराष्ट्रात क्वचित कोणाचा तरी असेल असे सांगून पर्यटन खात्याची अभिलाषा व्यक्त केली. याआधी हे खातं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्याकडे होतं. तेच खातं दीपक केसरकर यांनाही हवं होतं. पण ते न मिळाल्याने ते काहीसे नाराज असल्याची जोरदार चर्चा सध्या रंगली आहे. (deepak kesarkar upset over not getting aditya thackerays tourism ministry)
'...नाहीतर पर्यटन खातं मलाच मिळालं असतं'
पर्यटनाबाबत माझ्या एवढा अभ्यास क्वचितच कुणाला तरी असेल. मला पर्यटनाची फार आवड आहे आणि मी जग फिरलोय. उत्तम पर्यटन पाहिलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रात देखील पर्यटन अधिक चांगलं व्हावं अशी माझी इच्छा आहे. पण पर्यटन खाते आमच्या वाट्याला आले नाही. कारण आमचं हे आघाडीमधील सरकार आहे. मात्र, पर्यटन खाते आमच्या वाटेला आले असते तर ते नक्कीच मला मिळाले असते. मात्र, मी कोणतेही खाते मागितले नव्हते.
अधिक वाचा: शिंदे सरकारमध्ये अंतर्गत कलह होण्याची शक्यता, खातेवाटपावरून तीन मंत्र्यांची नाराजी?
'शिवसेनेने राष्ट्रवादीसोबत वाटाघाटी करून जोर केला असता तर चांगली खाती मिळाली असती'
दरम्यान, याचवेळी दीपक केसरकरांनी खात्यांवरुन शिवसेनेवर जोरदार टीका केली. 'सामना'मधून टीका करण्यापेक्षा तेव्हा जर शिवसेनेने वाटाघाटी करून जोर केला असता तर त्यांना चांगली खाती मिळाली असती आणि तीच खाती आम्हाला मिळाली असती. असं प्रत्युत्तर सामनामधील टीकेला दीपक केसरकर यांनी दिलं आहे.
'भाजप तुपाशी आणि शिंदे गट उपाशी' अशी टीका आजच्या सामनातून करण्यात आली आहे. जी खाती शिवसेनेकडे होती तीच खाती आम्हाला मिळाली आहेत. उलट आरोग्य खात्यासारखं महत्वपूर्ण मोठं खातं देखील आम्हाला मिळालं आहे. असं वक्तव्य दीपक केसरकर यांनी केलं आहे.
अधिक वाचा: Aditya Thackeray : खाते वाटपानंतर आदित्य ठाकरेंचे शिंदे-फडणवीस सरकारच्या वर्मावर बोट
शिंदे गट नाराज
मंत्रिमंडळ विस्तारानंतर झालेल्या खातेवाटपात शिंदे गटाच्या तुलनेत भाजपला महत्त्वाची खाती मिळाली आहेत. शिंदे गटातील अनेक मंत्र्यांची दुय्यम खाती देऊन बोळवण करण्यात आल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर आता संबंधित मंत्र्यांमध्ये नाराजी असून शिंदे गटाचे ३ कॅबिनेट मंत्री आपल्याला मिळालेल्या खात्याबाबत खूश नसल्याचं सांगण्यात येत आहे.
अधिक वाचा: बाळासाहेबांचे विचार जे जपतात ती खरी शिवसेना : केसरकर
मनाजोगी महत्त्वाची खाती न मिळाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील दादा भुसे, संदीपान भुमरे आणि दीपक केसरकर हे नाराज असल्याचं म्हटलं जातं आहे. बंदरे आणि खनिकर्म हे दुय्यम दर्जाचे खाते दिल्यानं दादा भुसे सर्वाधिक नाराज आहेत. तर दुसरीकडे रोजगार हमी, फलोत्पादन हे जुनेच खाते मिळाल्यानं संदीपान भुमरेही नाराज आहेत. त्यासोबतच शालेय शिक्षण हे खाते मिळूनही दीपक केसरकर हे फारसे खूश नसल्यांच म्हटलं जात आहे.