मालवण: माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे कनिष्ठ पुत्र आणि कणकवली मतदारसंघातील भाजपचे उमेदवार नितेश राणे यांनी केलेल्या एका वक्तव्यावर आता त्यांच्याच मोठ्या भावाने आक्षेप घेतला आहे. तो देखील थेट ट्वीट करुन. त्यामुळे आता राणे भावांमध्ये मतभेद असल्याचं दिसून येत आहे. नुकतंच नितेश राणे यांनी एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत असं वक्तव्य केलं आहे की, 'मी शिवसेनेवर टीका करणार नाही. तसंच आम्ही देखील आदित्य ठाकरेंच्या खांद्याला खांदा लावून काम करु.' पण त्या या वक्तव्यावरुनच राणे कुटुंबात वेगवेगळी मतं पाहायला मिळत आहेत.
नितेश राणेंनी केलेल्या या वक्तव्याला त्यांचे मोठे भाऊ निलेश राणे यांनी प्रचंड विरोध केला. यापुढे देखील आपण शिवसेनेवर समोरुन वार करु अशी थेट भूमिका घेतली आहे. 'नितेशच्या ह्या विषयाशी मी जराही सहमत नाही. ज्या पक्षानी राणे साहेबांना त्रास दिला, माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांनी सेनेशी दोन हात केले, केसेस घेतल्या, संघर्ष केला त्यांना हे कधीच सहन होणार नाही. राजकारण आपल्या ठिकाणी पण वार मी समोरूनच करणार.' असं म्हणत त्यांनी नितेश राणेंच्या वक्तव्याच्या अगदी विरुद्ध भूमिका घेतली आहे.
विधानसभा निवडणूक २०१९ साठी राज्यात भाजप आणि शिवसेनेची युती झाली आहे. यावेळी भाजपने कणकवली मतदारसंघातून नितेश राणे यांना उमेदवारी देऊ केली आहे. पण याचवेळी शिवसेनेने या मतदारसंघात आपला अधिकृत उमेदवार देऊ केला आहे. दरम्यान, आजवर कायमच शिवसेनेविरुद्ध आक्रमक भूमिका घेणाऱ्या नितेश राणेंनी काल (रविवार) आपली भूमिका मवाळ करत शिवसेनेवर टीका करणार नसल्याचं स्पष्ट केलं. पण त्यामुळे निलेश राणे मात्र फारच अस्वस्थ झाले आणि त्यांनी आपली अस्वस्थता ट्वीटरच्या माध्यमातून व्यक्त केली.
दरम्यान, आदित्य ठाकरे निवडणूक लढविणार असून त्याचविषयी जेव्हा नितेश राणे यांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा ते असं म्हणाले की, 'आदित्य ठाकरे निवडणूक लढवत असतील तर त्यांचं स्वागतच आहे. महाराष्ट्राच्या विकासात ते आमच्या खांद्याला-खांदा लावून काम करत असतील तर आम्ही देखील त्यांच्यासोबत काम करू. त्यासाठी त्यांना शुभेच्छा.' असं नितेश राणे म्हणाले.
दरम्यान, नितेश राणेंच्या या वक्तव्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. पण आता निलेश राणेंनी केलेल्या ट्वीटमुळे पुन्हा एकदा राणे विरुद्ध शिवसेना असाच वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.