'पुढच्या वेळी शिवसेना औषधालाही उरणार नाही', राणेंची शिवसेनेवर टीका 

ग्रामपंचायत निवडणुकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपला चांगलं यश मिळालं आहे. ज्यानंतर प्रतिक्रिया देताना नारायण राणे यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. 

Narayan Rane
पुढच्या वेळी शिवसेना औषधालाही उरणार नाही: राणे  |  फोटो सौजन्य: Twitter

सिंधुदुर्ग: महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये शिवसेनेना यंदा अनपेक्षितरित्या प्रचंड असं यश मिळवलं आहे. सध्याचं चित्र लक्षात घेतल्यास शिवसेना हा पक्ष सर्वाधिक ग्रामपंचायत जिंकणारा पक्ष ठरला आहे. पण असं असलं तरी तळकोकणात आणि विशेषत: सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेला मोठं यश मिळालेलं नाही. इथे नारायण राणे आणि पर्यायाने भाजपने चांगलं यश संपादन केलं आहे. येथील ७० ग्रामपंचायतींपैकी ४७ ग्रामपंचायतींवर भाजपने विजय मिळवला आहे. त्यामुळे राणे आपला गड राखण्यात यशस्वी ठरले आहेत. याचबाबत बोलताना राणेंनी शिवसेनेवर मात्र तोफ डागली आहे. 

'शिवसेना आणि कोकण अशी ओळख आता पुसली गेली आहे. पूर्वी मी जेव्हा शिवसेनेत होतो तेव्हा तशी ओळख निर्माण झाली होती. आता मात्र भाजपचा कोकणात बोलबाला आहे. कारण सिंधुदुर्गाच्या जनतेने पुन्हा एकदा माझ्यावर विश्वास दाखवला आहे. सिंधुदुर्गचा विकास कोण करु शकतो तर ते राणेच करु शकतात. हे त्यांना माहिती आहे. यावेळी त्यांना २१ ग्रामपंचायतीच जिंकता आल्या आहेत. इथे सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्यांचेच पालकमंत्री, आमदार खासदार आहेत. पण असं असून देखील त्यांना फक्त २१ जागा मिळाल्या. याचा अर्थ त्यांची ताकद कमी होत आहे. त्यामुळे यापुढच्या निवडणुकांमध्ये सिंधुदुर्गात शिवसेनेला जनता साद देणार नाही. कारण त्यांनी येथे काहीही विकासाची कामं केलेली नाही. त्यामुळे यापुढे शिवसेना औषधालाही सापडणार नाही. महाराष्ट्रात देखील त्यांची ताकद कमी होत चालली आहे. प्रत्यक्षात महाविकास आघाडीलाच जनतेची साथ मिळणार नाही. कोरोनामध्ये हे उघडेच पडले आहेत. सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. हे यांचं कर्तृत्व.' अशा घणाघाती टीका नारायण राणेंनी केली आहे. 

'राणेंना धक्का देणारा जन्माला आलेला नाही.'

दरम्यान, याच निकालाबाबत प्रतिक्रिया देताना नारायण राणेंचे पुत्र आणि आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेवर शरसंधान साधलं होतं. सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपने शिवसेनेला बॅकफूटवर ढकललं आहे. कारण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ७० ग्रामपंचायतींपैकी ४७ हून अधिक ग्रामपंचायत जिंकल्या आहेत. या निकालानंतर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी प्रतिक्रिया देताना असं म्हटलं आहे की, 'राणेंना धक्का देणारा जन्माला आलेला नाही.' दरम्यान, या ग्रामपंचायती निकालात सध्या तरी राणेंनी वर्चस्व राखल्याचं दिसतं आहे. 

पाहा नितेश राणे नेमकं काय म्हणाले: 

नितेश राणे यांनी ग्रामपंचायत निकालानंतर प्रतिक्रिया देताना असं म्हटलं की, 'मी सकाळपासून पाहतोय की, अनेक ठिकाणी अशा बातम्या सुरु आहेत की, राणेंना धक्का वैगरे... पण तुम्हाला आता पुन्हा सागंतो की, ७० पैकी ४७ हून अधिक ग्रामपंचायती भाजपने जिंकल्या आहेत. त्यामुळे राणेंना धक्का कुणीही देऊ शकत नाही, धक्का देणारा जन्माला आलेला नाही.'

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी