जामिनावर सुटका झाल्यानंतर राणेंची दोन ट्वीट

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विषयी केलेल्या वक्तव्याप्रकरणी अटक झालेले केंद्रीयमंत्री नारायण राणे यांची जामिनावर सुटका झाली. जामिनावर सुटका झाल्यानंतर नारायण राणे यांनी दोन ट्वीट केली.

Narayan Rane Tweets
जामिनावर सुटका झाल्यानंतर राणेंची दोन ट्वीट 
थोडं पण कामाचं
  • जामिनावर सुटका झाल्यानंतर राणेंची दोन ट्वीट
  • 'सत्यमेव जयते' असे पहिले ट्वीट
  • दुसऱ्या ट्वीटमध्ये आभार प्रदर्शन

महाड: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विषयी केलेल्या वक्तव्याप्रकरणी अटक झालेले केंद्रीयमंत्री नारायण राणे यांची जामिनावर सुटका झाली. जामिनावर सुटका झाल्यानंतर नारायण राणे यांनी दोन ट्वीट केली. 'सत्यमेव जयते' असे पहिले ट्वीटमध्ये नमूद केल्यानंतर काही तासांच्या अंतराने दुसरे ट्वीट करण्यात आले. या ट्वीटमध्ये राणेंनी त्यांना पाठिंबा देणाऱ्या तसेच त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या भाजपचे जाहीर आभार मानले.

जामीन मिळाल्यापासून आतापर्यंत फक्त दोन ट्वीट करणाऱ्या राणेंनी संध्याकाळी चार वाजता एक पत्रकार परिषद घेणार असल्याची घोषणा केली आहे. पत्रकार परिषदेत नारायण राणे स्वतःची बाजू मांडण्याची तसेच राज्य शासनावर जोरदार टीका करण्याची शक्यता आहे. 

याआधी महाडमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी एक वक्तव्य केले होते. या वक्तव्यामुळे सत्ताधारी शिवसेना नारायण राणेंवर नाराज झाली. राजकीय वातावरण तापले आणि नारायण राणे यांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल झाली. पोलिसांनी राणेंना अटक केली. अटकेनंतर महाडच्या कोर्टाने सरकारी वकील आणि राणेंचे वकील या दोघांची बाजू ऐकली. सरकारी वकिलाने राणेंना सात दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी केली. कोर्टाने ही मागणी फेटाळली आणि नारायण राणे यांना जामीन दिला. सुमारे तासभर सुनावणी सुरू होती. यात राणेंच्या वकिलाने सलग वीस मिनिटे युक्तीवाद केला. 

नारायण राणे यांना जामीन मिळाल्यानंतर राणे समर्थकांनी सिंधुदुर्गात जल्लोष केला. सुनावणीवेळी नारायण राणे यांच्या पत्नी, नितेश राणे, निलेश राणे, भाजप कार्यकर्ते न्यायालयाच्या परिसरात हजर होते. याचबरोबर भाजपा नेते व कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने न्यायालयाच्या आवारात जमलेले होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी