कणकवली: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कणकवलीतील भाजप उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचारासाठी कणकवलीत दाखल झाले आहेत. यावळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत माजी मुख्यमंत्री नारायण राणे, माजी खासदार निलेश राणे यांनी जाहीर प्रवेश केला आहे. नारायण राणे यांच्यासोबत त्यांच्या समर्थकांनीही यावेळी भाजपत प्रवेश केला आहे. यावेळी नारायण राणे यांनी आपला महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष सुद्धा भाजपत विलीन केला आहे. कोकणाच्या विकासासाठी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याचं यावेळी नारायण राणे यांनी स्पष्ट केलं आहे.
सिंधुदुर्गातील कणकवली विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने नितेश राणे यांना अधिकृत उमेदवारी दिली आहे. मात्र, असे असतानाही शिवसेनेने सतीश सावंत यांना आपला एबी फॉर्म देत उमेदवारी दाखल करण्यास सांगितले. तसेच अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशीही सतीश सावंत यांनी आपला अर्ज मागे न घेतल्याने कणकवली मतदारसंघात शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना रंगताना दिसणार आहे.
एकीकडे कणकवली मतदारसंघात शिवसेनेने सतीश सावंत यांना पाठिंबा जाहीर केला असताना आता नितेश राणे यांच्या प्रचारासाठी स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कणकवलीत दाखल झाले आणि त्यांनी जाहीर सभेला संबोधित केलं. त्यामुळे कणकवली मतदारसंघातील निवडणुकीला एक वेगळंच महत्व प्राप्त झालं आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं, "नितेश राणे हे प्रचंड मतांनी विजयी होतील. नितेश राणे हे ६५ ते ७० टक्के मतं मिळवत विजयी होतील. नारायण राणे हे यापूर्वीच भाजपचे सदस्य होते आता निलेश राणे आणि महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा प्रवेश करण्यात आला. सर्वांच्या आग्रहास्तव हा पक्षप्रवेश सिंधुदुर्गात आयोजित करण्यात आला".
या जाहीरसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नारायण राणे यांचं तोंडभरुन कौतुक केलं. तर नितेश राणे यांना संयम बाळगण्याचा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. आक्रमकतेसोबतच संयम सुद्दा गरजेचा असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.