सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यात शिवसेनेचे (Shiv Sena) स्थानिक नेते संतोष परब यांना मारहाण (Beating Case) केल्याप्रकरणी नितेश राणेंना (Nitesh Rane) अटक होणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यावरून राजकारण तापलेले आहे. अशात नितेश राणे अद्याप समोर आलेले नाहीत. त्यामुळे ते अज्ञातवासात गेले की काय अशी शंका उपस्थित केली जात आहे. दरम्यान नितेश राणे यांना अटक होणार असल्याची चर्चा सुरू असताना आता केंद्रीय मंत्री (Union Minister) आणि नितेश यांचे वडील नारायण राणेंची (Narayan Rane) प्रतिक्रिया समोर आली आहे. अटकेवर सवाल केला असता, कसली अटक? नितेश राणेंनी काहीच केलेले नाही. असा प्रतिप्रश्न सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री (Minister for Micro, Small and Medium Enterprises) नारायण राणे यांनी सांगितले. सत्ताधारी शिवसेनेने सभागृहात नितेश राणेंच्या अटकेची मागणी केली. अधिवेशन सुरू असताना अटक करण्यासाठी प्रशासनाला तशी परवानगी अध्यक्षांकडून घ्यावी लागणार आहे. याच दरम्यान नितेश राणेंनी अटकपूर्व जामीनासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली आहे.
पत्रकारांच्या प्रश्नाचे उत्तर देताना नारायण राणे म्हणाले, "नितेश राणे आणि सिंधुदुर्ग येथे झालेल्या राड्याशी काहीच संबंध नाही. राजकीय सूड भावनेतून त्यांच्यावर आरोप केले जात आहेत." आगामी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांचा पराभव होणार आहे. त्यामुळेच सूडाच्या भावनेतून अटकेची कारवाई होऊ शकते. परंतु केस टाकली की अटक होणार हे मला काही माहित नाही. असेही ते पुढे बोलताना म्हणाले आहेत. शिवसैनिकावर हल्ल्याच्या एका प्रकरणात नितेश राणेंना अटक होणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यावरून राजकारण तापलेले आहे. अशात नितेश राणे अद्याप समोर आलेले नाहीत. त्यामुळे ते अज्ञातवासात गेले की काय अशी शंका उपस्थित केली जात आहे. त्यावर बोलताना ते कुठे अज्ञातवासात गेलेले नाहीत. ते आमदार आहेत त्यांना अज्ञातवासात जाण्याची काय गरज. ते सिंधुदुर्गातच आहेत असा दावा नारायण राणेंनी केला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेचे स्थानिक नेते संतोष परब यांना मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीसाठी थेट नितेश राणे यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. यापूर्वी त्यांना दोन वेळा पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले होते. याच प्रकरणात मुख्य आरोपी सचिन सातपुते याला दिल्लीतून अटक करण्यात आली. त्याच्या अटकेनंतर आता नितेश राणेंना अटक होणार अशी शक्यता आहे. तत्पूर्वी पोलिसांनी नितेश राणेंना तिसऱ्यांदा चौकशीसाठी बोलावले होते. परंतु, ते हजर झाले नाहीत. मीडिया रिपोर्टनुसार, पोलिसांनी त्यांच्या घरात जाऊनही चौकशी केली. परंतु, नितेश राणे घरात नसल्याचे दिसून आले. यानंतर त्यांनी थेट कोर्टात अर्ज दाखल केला.