रत्नागिरीत रेकॉर्ड ब्रेक पाऊस; मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर, राजापूर शहरातील बाजारपेठेत शिरले पाणी

रत्नागिरी जिल्ह्यात कालपासून पावसाने जोर धरला असून अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे.

Record break rain in Ratnagiri
रत्नागिरीत रेकॉर्ड ब्रेक पाऊस  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • या मुसळधार पावसामुळे राजापूर शहरातील बाजारपेठेत पाणी
  • राजापुरातील अर्जुना आणि कोदवली नदीला पूर
  • कोकणासाठी पुढचे ३ ते ४ दिवस धोक्याचे असून अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात कालपासून पावसाने जोर धरला असून अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार बरसणाऱ्या पावसामुळे राजापूर शहरातील जवाहर चौकात पाणी भरले आहे. साधारण तीन फुटापर्यंत हे पाणी असण्याची शक्यता आहे. राजापुरातील अर्जुना आणि कोदवली नदीला पूर आला आहे. त्यामुळे नगरपरिषदेने देखील नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करत सतर्कतेचा इशारा दिला आहे.

चौकात पाणी आल्याने आता व्यापाऱ्यांनी आपल्या सामानाची हलवाहलव करत ते सुरक्षित ठिकाणी नेण्यास सुरूवात केली आहे. इतकेच नाहीतर नगराध्यक्ष जमीर खलीफे यांनी पूरपरिस्थितीची पाहणी केली असल्याचीही माहिती आहे. खरंतर, राजापूर तालुक्यात कालपासून जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे संपूर्ण शहरात पाणी घुसलं आहे. शहरात पूर पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, राजापूर इथल्या मुंबई-गोवा महामार्गवर ब्रिटिशकालीन ब्रिजवर राजापूर तहसिलदार प्रतिभा वराळे, मुख्यधिकारी देवांनंद ढेकळे, नगराध्यक्ष जमिर खलिपे, स्थानिक नगरसेवक सुभाष बंड्या बाकाळकर, राजापूरचे तलाठी कोकरे यांनी वाढत्या पाण्याची पाहणी केली. जर अर्जुना नदीचे पाण्याची पातळी वाढली तर मुंबई-गोवा महामार्ग हा अवजड वाहतूकीसाठी बंद केला जाईल अशीही माहिती देण्यात आली आहे. अर्जुना नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. रविवारपासून पडणाऱ्या पावसामुळे राजापूर तालुका आणि शहर परिसरात पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. 

दरम्यान, पुढचे ३ ते ४ दिवस हे कोकणासाठी धोक्याचे असून अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी. शक्य असेल तरच घराबाहेर पडावं असं हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यालाही रात्री पावसाने झोडपले आहे. आताही पावसाचा जोर कायम असल्याची माहिती आहे. जिल्ह्यात सर्वञ जोरदार वा-यासह मुसळधार पाऊस सुरू असून अनेक ठिकाणी सकल भागात पाणी साचले आहे. नद्यांचीही पाणी पातळी वाढली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी