कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमच्या वडिलोपार्जित मालमत्तेचा होणार लिलाव

सिंधुदुर्ग
Updated Jun 18, 2019 | 16:37 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

भारताचा मोस्ट वॉन्टेड कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमच्या वडिलोपार्जित मालमत्तेवर आता कारवाई होणार आहे. रत्नागिरी आणि खेड इथं असलेल्या त्याच्या संपत्तीचा लिलाव केला जाणार आहे. जाणून घ्या संपूर्ण बातमी...

Dawood Ibrahim
दाऊद इब्राहिमच्या कोकणातील संपत्तीवर टाच 

नवी दिल्ली: अँडरवर्ल्ड डॉन आणि भारताचा मोस्ट वॉन्टेड असलेल्या दाऊद इब्राहिम संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. दाऊदच्या मुंबईतील संपत्तीनंतर आता खेड आणि रत्नागिरी इथल्या त्याच्या वडिलोपार्जित मालमत्तेचा लिलाव होणार आहे. कोकणात त्याच्या १४ मालमत्ता आहेत, त्या सर्वांचा आता लिलाव होणार असल्याची माहिती मिळतेय. या मालमत्तेमध्ये एक बंगला आणि दाऊदच्या बहिणीच्या नावावरील एका पेट्रोल पंप जमिनीचा समावेश आहे. स्मगलिंग अँड फॉरेन एक्सचेंज मॅनीपुलेटर्स अॅथॉरिटीनुसार जिल्हाधिकारी या सर्व मालमत्तेच्या मूळ किमतीबाबत माहिती काढण्याचा प्रयत्न करत आहे.

साफेमा म्हणजेच स्मगलिंग अँड फॉरेन एक्सचेंज मॅनीपुलेटर्स अॅथॉरिटीच्या एका टीमनं रत्नागिरीतील दाऊदच्या संपत्तीवर ताबा मिळवणं सुरू केलंय. साफेमानुसार खेड इथं दाऊदची आई अबीना बी आणि बहिण हसिना पारकर यांच्या नावावर जवळपास २४ मालमत्ता आहेत. ज्या साफेमानं आपल्या ताब्यात घेतल्या आहेत. एकदा सर्व मालमत्तांची किंमत ठरली की मग त्याचा लिलाव सुरू केला जाणार आहे.

साफेमा अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मंबके गावातील दाऊदच्या मालमत्तेची दुरूस्ती सुरू आहे. त्यामुळे तिथं लिलाव प्रक्रिया उशिरानं सुरू होईल. मुंबई आणि सोलापूरचे अधिकारी या सर्व मालमत्तेच्या किमतीचा आढावा घेत आहेत. एकदा सर्व संपत्तीचं विवरण अधिकाऱ्यांच्या हाती आलं की लिलाव सुरू होणार आहे.

दाऊद इब्राहिमचे वडील इब्राहिम कासकर हे मुंबई पोलीस दलामध्ये काम करायचे. त्यांनी मंबके गावात बंगला बांधला. सध्या या बंगल्याची स्थिती चांगली नसून त्याची दुरूस्ती केली जात आहे. गेल्या वर्षी म्हणजेच २०१८ साली साफेमानं दाऊदच्या नावे असलेल्या मालमत्तांचा तपास केला होता. यात पाकमोडिया स्ट्रीटवर असलेल्या ‘अमीन मँशन’ या मुख्य बंगल्याचा समावेश होता. याची मूळ किंमत ७९.४३ लाख होती. हा बंगला सैफी बुरहानी अपलिफ्टमेंट ट्रस्ट (एसबीयूटी)नं ३.५१ कोटी रुपयांना खरेदी केला होता.

तसंच मुंबईतील नागपाडा भागात असलेल्या गार्डन हॉल अपार्टमेंटमधील ६०० स्क्वेअर फूट दाऊदच्या फ्लॅटचा लिलावही केला गेला. हा फ्लॅट दाऊदची बहिण हसिना पारकरच्या नावावर होता. लिलावामध्ये याची किंमत १.८० रुपये लावली गेली.

साफेमा म्हणजे काय?

स्मगलिंग अँड फॉरेन एक्सचेंज मॅनीपुलेटर्स अॅथॉरिटी (साफेमा) – SAFEMA हा एक सरकारी विभाग आहे जो अर्थ मंत्रालयाच्या अख्यत्यारित येतो. याच विभागानं दाऊदच्या संपत्तीची माहिती काढण्यासाठी रत्नागिरी आणि खेडमध्ये आपली टीम मुंबई आणि सोलापूरहून पाठवली आहे.

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमच्या वडिलोपार्जित मालमत्तेचा होणार लिलाव Description: भारताचा मोस्ट वॉन्टेड कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमच्या वडिलोपार्जित मालमत्तेवर आता कारवाई होणार आहे. रत्नागिरी आणि खेड इथं असलेल्या त्याच्या संपत्तीचा लिलाव केला जाणार आहे. जाणून घ्या संपूर्ण बातमी...
Loading...
Loading...
Loading...