Uday Samant news: एकनाथ शिंदे गटात गेलेल्या उदय सामंत यांच्या गाडीवर मंगळवारी (२ ऑगस्ट) रात्रीच्या सुमारास हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात उदय सामंत यांच्या गाडीची काच फुटली आहे. सुदैवाने उदय सामंत यांना कुठलीही दुखापत झालेली नाहीये. मात्र, या हल्ल्यानंतर आता राज्यातील राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. उदय सामंत यांच्या गाडीवरील हल्ल्यानंतर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ट्विट करत आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला त्यानंतर आता नितेश राणेंच्या या ट्विटला शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. (Shiv sena vs rane in konkan after attacked on uday samant car in pune)
उदय सामंत यांच्या गाडीवर पुणे येथे हल्ला झाल्यानंतर आमदार नितेश राणे यांनी ट्विट करत थेट आदित्य ठाकरे यांना टार्गेट केलं. नितेश राणे यांनी ट्विट करत म्हटलं, “निष्ठा यात्रेसोबतच फटके यात्रा काढण्याची वेळ आला आहे", तरच "म्याऊ" "म्याऊ" बंद होईल! हीच ती वेळ!" याला आमदार वैभव नाईक यांनी प्रत्युत्तर देत म्हटलं, अजून निष्ठा यात्रा संपलेली नाही त्यामुळे नितेश राणे यांची जी भूमिका असेल शिवसेना सुद्धा त्यांना त्याच भूमिकेतून उत्तर देईल.
अधिक वाचा : शिवसेना संपविण्याचा डाव समोर आला - उद्धव ठाकरे
संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसैनिकांच्या डोळ्यामध्ये अश्रू आणायचं काम यांनी केलं. त्यामुळेच महाराष्ट्रातील शिवसैनिक पेटून उठला आहे. परंतु शिवसैनिक पेटून उठला म्हणून कुणाची गाडी फोडण्याची भूमिका कुणाची नसेल. आमचा लोकशाही पद्धतीने उत्तर देण्याचा प्रयत्न आहे म्हणून आम्ही लोकांसमोर जात आहोत. गाड्या फोडण्याच्या भूमिकेला आदित्य ठाकरे समर्थन करत नाहीत असंही आमदार वैभव नाईक म्हणाले.
भाजपच्या माध्यमातून बंडखोरी केलेल्या आमदारांनी आता आमचा अंत पाहू नये. उदय सामंत यांनी लोकशाहीत अनेकवेळा आपले विचार बदलले आहेत, दुर्दैवाने उदय सामंत यांची गाडी आदित्य ठाकरे यांच्या सभेच्या ठिकाणी आली म्हणून ती घटना घडली. उदय सामंत त्याठिकाणी आले नसते तर ती दुर्घटना घडली नसती अशी प्रतिक्रिया आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे.
उदय सामंत यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणी शिवसेनेचे सहा कार्यकर्त्यांवर भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला आहे. त्यांना अटक केली आहे. पुणे शहर शिवसेना प्रमुख संजय मोरे , राजेश पळसकर, चंदन साळुंखे, सुरज लोखंडे आणि अजून दोन कार्यकर्त्यांना अटक केली आहे. त्यांच्या वर 307, ३५३, ३४९, ५०६ , 309 सारखे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.