उद्धव ठाकरेंनी राणे पिता-पूत्रांना धू-धू धुतले... पाहा काय म्हणाले कणकवलीत 

सिंधुदुर्ग
Updated Oct 16, 2019 | 19:14 IST | टाइम्स नाऊ मराठी

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कणकवलीच्या सभेत नारायण राणे आणि नितेश राणे यांचे नाव न घेता जोरदार फटकेबाजी केली. 

vidhansabha election 2019 uddhav thackeray shiv sena bjp narayan rane nitesh rane news in marathi
उद्धव ठाकरेंनी राणे पिता-पूत्रांना धू-धू धुतले... 

कणकवली : शिवसेना प्रमुखांनी २००५ मध्ये यांना लाथ मारून हाकलून दिले होते.  अशी खुनशी वृत्ती मी माझ्या भगव्याभोवती फिरकू देणार नाही आणि माझ्या मित्रासोबतही ही वृत्ती नको. ही पाठीत वार करणारी वृत्ती आहे, अशा शब्दांत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे आणि नितेश राणे यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीकेची झोड उठवली. 

कणकवलीत शिवसेनेचे अधिकृत उमेदवार सतीश सावंत यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे हे आले होते. त्यावेळी त्यांनी आपल्या भाषणातील बहुतांशी वेळ हा राणे आणि त्यांच्या कुटुंबियांवर टीका करण्यात खर्ची पाडला. यावेळी भाषणाला सुरूवात करताना उद्धव ठाकरे म्हणाले, मी शिवसेनेच्या कणकवलीतील उमेदवाराला विजयी करण्यासाठी आलो आहे. या ठिकाणी भाजप आपल्यासमोर आहे. पण त्यामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये भांडण आहे, असे समजण्याचे कारण नाही. मुख्यमंत्र्यांची आणि माझी चांगली मैत्री आहे. संपूर्ण महाराष्ट्रात मी युतीसाठी प्रचार करतोय. त्यामुळे आता संपूर्ण महाराष्ट्रा हा भगवा होणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. 

इतिहासातून काही तरी शिकायचं असतं. 

इतिहासात काही चुका झालेल्या असतील तर त्या चुकांमधून काही तरी शिकायचं असतं. नारायण राणे यांचे नाव न घेता उद्धव ठाकरे म्हणाले, शिवसेनेतून हे बाहेर नाही पडले तर बाळासाहेबांना यांना लाथ मारू हाकलून दिले. त्यानंतर एक पत्रकार परिषद घेतले होते. तेव्हा त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यावर पत्रकारांनी मला प्रश्न विचारला, त्यावेळी मी सोनियाजी आणि काँग्रेसला शुभेच्छा देतो असे म्हटले होते. आता तेच मी भाजपला शुभेच्छा देतो असे म्हणत आहे. कारण  शिवसेना प्रमुख दृष्टे होते. मग त्यांना हकलून दिले होते. त्यानंतर ते काँग्रेसमध्ये गेले काँग्रेसची वाट लावली.  स्वतःचा पक्ष काढला त्यांचीही वाट लावली आता भाजपमध्ये गेले आहेत. त्यांना शुभेच्छा असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी मित्र पक्ष भाजपला राणेना भाजपमध्ये प्रवेश देऊन चूक केल्याचा चिमटा काढला. 

रामायणातील मायावी राक्षस 

रामायणात मायावी राक्षस होते. तसेच आताच्या राजकारणात मायावी राक्षस आहेत. ते काँग्रेसच्या रुपात आले. नंतर स्वाभिमानीच्या रुपात आले आणि आता भाजपच्या रुपात अवतरले आहे. माझा लढा या खुनशी वृत्तीशी आहे. त्यांनी अनेकांच्या जमिनी हडपल्या. मी म्हणतो शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार तर त्यावर ते म्हणतात, उद्धव ठाकरेंना सात बारा तरी कळतो का. तर मी जमिनी हडपण्याचे धंदे करत नाही, त्यामुळे मला सातबारा माहिती नाही.  त्यामुळे मुख्यमंत्र्यांना माझा सल्ला आहे. अशा लोकांना भाजपपासून दूर ठेवा, हेच सांगायला मी या ठिकाणी आलो आहे. 

पक्ष सोडताना शिव्या... 

त्यांनी शिवसेना सोडली तेव्हा शिवसेनेला शिव्या घातल्या. काँग्रेस सोडल्या तेव्हा काँग्रेसला शिव्या घातल्या. स्वतःचा पक्ष सोडला तर त्यांनी एकामेकांना शिव्या घातल्या असतील. आता ते भाजपसोबत आले आहेत. भाजपमध्ये बिनसलं तर आपण पाहू असा इशाराच उद्धव ठाकरे यांनी यावेळी भाजपला दिला आहे. 

मातोश्रीच्या मीठाला न जागलेला 

१० रुपयांत जेवणाच्या शिवसेनेच्या घोषणेवर हे म्हणाले, काय जेवण मातोश्रीतून जाणार आहे का? मातोश्रीच्या मीठाला न जागलेल्यांनी आम्हांला शिकवू नये, असाही टोला उद्धव यांनी लगावला. 

ही खुनशी वृत्ती 

ही खुनशी वृत्ती माझ्या भगव्यासोबत मी येऊ देणार नाही आणि ती माझ्या मित्रासोबतही नको असे माझे मत आहे. ही पाठीत वार करणारी वृत्ती आहे.  भाजपच्या एखाद्या कट्टर कार्यकर्त्याला उमेदवारी दिली असती तर मीही या ठिकाणी आलो असतो, भाजपच्या प्रचाराला संदेश पारकर असताना बाहेरच्या व्यक्तीला उमेदवारी दिली आहे. 

आज सर्वात खुश हा शब्द असेल... 

आज सर्वात खुश कोण असेल तर स्वाभिमान हा शब्द असेल, सुटलो बाबा या जोखडातून असे म्हटले असेल. इकडे झुकव मान, तिकडे झुकव मान आणि म्हणे मी स्वाभीमान अशी बोचरी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. 

तोडून मोडून टाकू 

आता शेवटचे काही दिवस शिल्लक असताना कोकणच्या भोळ्या भाबड्या जनतेवर कोणी दादागिरी करण्याची हिम्मत केली तर तोडून मोडून टाकू असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी