Yatra of Bharadi Devi of Anganewadi on 24th February 2022 आंगणेवाडी: महाराष्ट्रातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंगणेवाडीच्या श्री भराडी देवीचा यात्रोत्सव आता २४ फेब्रुवारी २०२२ रोजी आहे. या यात्रेला हजारोंच्या संख्येने भाविक येतात. तळकोकणातील हा मोठा यात्रोत्सव आहे. मात्र मागील दोन वर्षांपासून कोरोना संकटामुळे यात्रेच्या आयोजनावर कडक निर्बंध होते. यामुळेच यंदा यात्रोत्सवाची तारीख जाहीर होताच भाविकांनी आणि पर्यटकांनी रेल्वे आणि बसचे बुकिंग सुरू केले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील मसुरे गावाच्या आंगणेवाडीच्या श्री देवी भराडी मातेचा ‘यात्रोत्सव आंगणेवाडी’ची यात्रा नावाने प्रसिद्ध आहे. भराडी देवीचा कौल मिळाल्यावरच यात्रोत्सवाची तारीख ठरते असे म्हणतात. दिवाळीत शेतीची कामे झाली की आंगणेवाडीतील देवीचे मानकरी देवीला कौल लावतात, कौल लावून जत्रेचा दिवस निश्चित केला जातो. एकदा निश्चित झालेली तारीख कोणत्याही परिस्थितीत बदलत नाही.