आमदार राजेंद्र राऊत यांच्या दोन्ही मुलांविरोधात अखेर गुन्हा दाखल

कोविड प्रोटोकॉल उल्लंघन प्रकरणी आमदार राजेंद्र राऊत यांच्या मुलांविरोधात गुन्हा दाखल. दोन्ही मुलांची लग्न थाटामाटात झाली. यावेळी अनेकांनी मास्क घातला नव्हता तसेच सोशल डिस्टंस पाळला नव्हता.

A case has been registered against both the sons of MLA Rajendra Raut
आमदार राजेंद्र राऊत यांच्या दोन्ही मुलांविरोधात अखेर गुन्हा दाखल   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • शिवाय शनिवार- रविवारी तर संपूर्ण दिवस लॉकडाऊन असतो
  • रणजीत आणि रणवीर यांचा विवाह रविवारी ६.४५ मि. मोठ्या थाटामाटात पार पडला
  • चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधींची उपस्थिती

सोलापूर : राज्यात कोरोनाची लाट संपली नसून, सरकारने आणि प्रशासनाने कोरोनाचा विळखा वाढू नये यासाठी नियम घालून दिले आहेत. मात्र, असं असताना देखील सोलापुर जिल्ह्यातील बार्शी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र राऊत यांनी त्यांच्या दोन्ही मुलांचं मोठ्या थाटामाटात शाही विवाहसोहळा केला होता. या प्रकरणी सर्व स्तरातून टीकेची झोड उठल्यानंतर पोलीस प्रशासन आक्रमक झालं असून, पोलिसांनी या प्रकरणी आमदारांची दोन्ही मुलं रणजित राऊत आणि रणवीर राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. सुरुवातीला आयोजक योगेश पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. योगेश पवार यांनी सदर लग्नासाठी परवानगी मागितली होती. मात्र, पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल होऊनही सर्व स्तरातून टीका होऊ लागल्याने पोलिसांनी आमदार राउत यांच्या मुलांविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

शिवाय शनिवार- रविवारी तर संपूर्ण दिवस लॉकडाऊन असतो

दरम्यान, आमदार राउत यांच्या मुलांच्या लग्नात सर्व नियमांना खुद्द लोकप्रतिनिधीच हरताळ फासत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. कोरोनाच्या सर्व नियमांना फाट्यावर बसवत जिल्ह्यातल्या बार्शी येथील आमदारांनी आपल्या मुलांचा जंगी विवाह सोहळा पार पाडला. कोरोनाची लाट ओसरायला मदत होईल म्हणून कडक नियमांचा त्रास होत असताना सुद्धा, लोक सहन करत आहेत. तर इकडे सोलापूर जिल्ह्यात देखील संध्याकाळी चारनंतर सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. शिवाय शनिवार- रविवारी तर संपूर्ण दिवस लॉकडाऊन असतो. महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट अद्यापही पूर्णपणे ओसरलेली नाही. अशात तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात आहे, त्यामुळे राज्यात अजूनही निर्बंध कायम आहेत.

रणजीत आणि रणवीर यांचा विवाह रविवारी ६.४५ मि. मोठ्या थाटामाटात पार पडला

आमदार राजेंद्र राऊत हे बार्शीतील लक्ष्मी सोपान बाजार समितीचे चेअरमनही आहेत. त्यांच्या दोन्ही मुलांच्या लग्न सोहळ्याला हजरोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. अनेकांच्या चेहऱ्यावर मास्क नव्हते. सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा या लग्न सोहळ्यात उडालेला होता. रणजीत आणि रणवीर यांचा विवाह रविवारी ६.४५ मि. मोठ्या थाटामाटात पार पडला. 

चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधींची उपस्थिती

विशेष म्हणजे या विवाह विवाहसोहळ्याला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपचे अनेक आमदार, पदाधिकारी देखील उपस्थित होते. आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार प्रशांत परिचारक, शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर, माजी आमदार हर्षवर्धन पाटील, भाजप आमदार आणि माजी मंत्री सुभाष देशमुख, आमदार राम सातपुते, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार समाधान अवताडे, यांच्यासह सोलापूर जिल्ह्यातील भाजपचे अनेक पदाधिकारीदेखील या लग्नाला उपस्थित होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी