चक्क ग्रामपंचायतीतचं अधिकाऱ्यांची दारू पार्टी, व्हिडिओ व्हायरल

सोलापूर
अजहर शेख
Updated May 29, 2020 | 17:58 IST

दारू पार्टीत स्थानिक प्रशासनातील ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी अनिल बारसकर, कार्यालयीन अधीक्षक विलास मस्के, बांधकाम अभियंता जाधव, लिपिक शेख हे वैराग ग्रामपंचायत कार्यालयात दारु पार्टीत व्यस्त होते.

Alcohol party of officer in Gram Panchayat, case filed against four persons!
चक्क ग्रामपंचायतीतचं अधिकाऱ्यांची दारू पार्टी, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल!  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • शासकीय आस्थापनेत मद्यप्राशन केल्याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल
  • दारू पार्टीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
  • वैराग या गावात एक किराणा व्यापारी कोरोना बाधित

सोलापूर : महाराष्ट्रसह संपूर्ण देशात कोरोनाचे सावट गडद होत चालले असून, सोलापूर जिल्ह्यातला कोरोना बाधितांचा आकडा आठशेच्या पुढे गेला असून सोलापूर जिल्ह्यातल्या लोकांची चिंता वाढली आहे. मात्र सोलापूर जिल्हा आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. गाव कोमात अन प्रशासनाची दारु पार्टी जोमात अशीच म्हणायची  वेळ आली आहे.

ग्रामपंचायत कार्यालयात अधिकाऱ्यांची दारु पार्टी

सोलापुरात कोरोनाचे संकट अधिक मोठ्या प्रमाणात वाढत चाललेले असून, कोरोनामुळे सोलापूर जिल्हाही प्रतिबंधित क्षेत्र असताना, सोलापूर जिल्ह्यातील वैराग ग्रामपंचायत कार्यालयात चक्क अधिकारी दारुची पार्टी करत असल्याचं समोर आलं आहे. अधिकाऱ्यांची दारू पार्टी सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे.

गावातील किराणा व्यापारी कोरोना बाधित

गेल्या दोन दिवसांत बार्शी तालुक्यातील वैराग या गावात एक किराणा व्यापारी कोरोना बाधित आढळला असून त्याच्या संपर्कात असणारे अनेक जणांचे रिपोर्ट अजून यायचे आहेत. त्याच दरम्यान वैराग ग्रामपंचायत कार्यालयात एक दारुची पार्टी रंगली आणि लागलीच त्या पार्टीचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्याने बार्शी तालुक्यात आणि वैराग गावात एकच चर्चा रंगली असून सोबतच घबराट ही पसरली आहे.

सोलापुरात वाढतायेत झपाट्याने रुग्ण

महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यातच सोलापूर जिल्ह्यात देखील कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. वैरागमध्ये म्हणजे बार्शी तालुक्यात कोरोनाने शिरकाव केला. जिल्हा प्रशासनाकडून वैरागला प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले. मात्र याच वैराग ग्रामपंचायत कार्यालयात चक्क अधिकारी दारुची पार्टी करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. एकीकडे जिल्हा प्रशासन रात्रंदिवस राबतंय. तर दुसरीकडे स्थानिक प्रशासनातील अधिकारीच पार्ट्यांमध्ये दंग असल्याचं चित्र आहे. 

दारू पार्टीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल 

सदर दारू पार्टीत स्थानिक प्रशासनातील ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी अनिल बारसकर, कार्यालयीन अधीक्षक विलास मस्के, बांधकाम अभियंता जाधव, लिपिक शेख हे वैराग ग्रामपंचायत कार्यालयात दारु पार्टीत व्यस्त होते. या पार्टीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सोलापूरचे पोलीस अधीक्षक बार्शी दौऱ्यावर आले असतानाच, अधिकाऱ्यांना दारु, गुटखा अशा अवैध धंद्यांवर कारवाई करा असा आदेश देऊन गेले होते. हे सर्व खोटं ठरवत प्रतिबंधित क्षेत्रात दारु येते, पार्ट्या होतात म्हणजे स्थानिक पोलिसांच्या कामाबद्दल देखील प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

गावकऱ्यांकडून या घटनेबाबत तीव्र नाराजी

गावकऱ्यांकडून या घटनेबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. अशा बेजबाबदार कर्मचाऱ्यांना बडतर्फ करावे अशी मागणी केली जात आहे. दरम्यान सदर व्हिडिओचे चित्रीकरण करत असताना, ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना शिव्या देखील दिल्या असल्याची माहिती व्हिडिओतून समोर येत आहे.

चौघांविरोधात गुन्हा दाखल

दरम्यान या या प्रकरणाची पोलिसांनी तात्काळ दखल घेत शासकीय आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी तसेच जिल्ह्यात दारूबंदी असताना शासकीय आस्थापनेत मद्यप्राशन केल्याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भादंवि कलम २६९,२७०,१८८ सहकलम राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम ५५ आणि महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ८५ (१) नुसार या चारही आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी